ODI World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकाबाबत मोठी बातमी येत आहे. क्रिकेट महाकुंभचे वेळापत्रक आज, स्पर्धा सुरू होण्याच्या १०० दिवस आधी जाहीर केले गेले.
WC 2023 Venues & Schedule: आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ च्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आज संपली आहे. टूर्नामेंट सुरू होण्याच्या अगदी १०० दिवस आधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आज वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुंबईत सकाळी ११.३० वाजता बीसीसीआयने एक पत्रकार परिषद घेत विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या निमंत्रणानुसार हा कार्यक्रम मुंबईतील एस्टर बॉलरूम, सेंट रेजिस, लोअर परेल येथे संपन्न झाला. भारत-पाकिस्तान हा बहुचर्चित महामुकाबला अहमदाबादमध्येच खेळवण्यात येणार आहे.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी प्रस्तावित सामने आणि स्थळांची रूपरेषा देणारा मसुदा वेळापत्रक जूनमध्ये देशांना पाठवला होता. मात्र, या मसुद्यावर पाकिस्तानने खोडा घातला होता. मसुद्यानुसार, सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये गतविजेत्या इंग्लंडचा उपविजेता न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर, अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत
विश्वचषकादरम्यान, ४५ सामन्यांचा समावेश असलेल्या राउंड रॉबिन लीगमध्ये १० संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जाईल. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. जर भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर त्याचा उपांत्य सामना मुंबईत होईल. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लीग सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
वानखेडे स्टेडियमवर २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी श्रीलंकेचा पराभव केला होता. तसे, १९८७च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना ईडन गार्डनने आयोजित केला होता जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
अहमदाबादमध्ये खेळण्यास पाकिस्तान बोर्डाने सहमती दर्शवली
आधी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वर्ल्डकपच्या वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही हे यातून स्पष्ट होते. याशिवाय पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना बंगळुरूमध्ये खेळायचा आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या तीन सामन्यांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात अहमदाबादमध्ये स्पर्धा व्हावी अशी पीसीबीची इच्छा नव्हती. तसेच, पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंतीही केली होती. आता बातमी येत आहे की, पाकिस्तानने अहमदाबादमध्ये भारत विरुद्धचा सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे.