पाकिस्तानचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतात, मात्र बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला महीश थिकसाना व दुनिथ वेल्लालागे यांना कमी लेखून चालणार नाही.
हैदराबाद : पाकिस्तानचा प्रयत्न श्रीलंकेविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या विश्वचषक सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरीचा असणार आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला असला तरीही, त्यांना विशेष चमक दाखवता आली नव्हती. नेदरलँड्ससारख्या संघांविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांना छाप पाडता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेकडे चांगले फिरकीपटू असल्याने त्यांना सामन्यात सावधपणे खेळावे लागेल.
पाकिस्तानचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतात, मात्र बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला महीश थिकसाना व दुनिथ वेल्लालागे यांना कमी लेखून चालणार नाही. या दोन्ही गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी दिल्ली येथील सामन्यात १०२ धावा दिल्या होत्या. तसेच, थिकसाना आशिया चषकादरम्यान दुखापतीचा सामना करावा लागला होता. गेल्या दहा दिवसांपासून पाकिस्तानचा संघ हैदराबाद येथे मुक्कामाला आहे आणि याच ठिकाणी ते दोन सराव सामनेही खेळले आहेत. त्यामुळे त्यांना परिस्थितीची चांगली माहिती आहे. मात्र, तरीही नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात त्यांना अडचणीत टाकले होते. एकवेळ त्यांची अवस्था ३ बाद ३८ अशी बिकट होती. त्यानंतर मोहम्मद रिझवान व सौद शकील यांनी डावाला सांभाळले. तसेच, मोहम्मद नवाझ व शादाब खान यांनी निर्णायक खेळी केल्या.
शकीलची लय पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली गोष्ट राहिली. रिझवान व शकील यांनी मिळून संघाला अडचणीतून बाहेर काढले. पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेनंतर येथे दाखल झाला आणि विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करत खेळाडूंना चमकण्याची चांगली संधी आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या चुकांमधून शिकत पाकिस्तानच्या खेळाडूंना आपला खेळ उंचवावा लागेल. दुसरीकडे, १९९६ विश्वचषक विजेता श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. ‘आयपीएल’ मध्ये काही खेळाडू खेळत असल्याने श्रीलंकेच्या संघाला त्याचा फायदा होऊ शकतो.
’ वेळ : दुपारी २ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
१, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)
’ ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
श्रीलंका
* संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी कुसाल पेरेरा, पथुम निसांका यांच्यावर असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना फारशी चमक दाखवता आली नव्हती.
* मध्यक्रमात कुसाल मेंडिस, चरिथ असलंका व कर्णधार दासुन शनाका यांनी आक्रमक अर्धशतकी खेळत आपले इरादे स्पष्ट केले होते.
* पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास श्रीलंकेच्या गोलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल.
पाकिस्तान
* पाकिस्तानला बाबर आझम, इमाम-उल-हक यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्यासह सलामीवीर फखर झमानच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष असणार आहे.
* नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवान व सौद शकील यांनी संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते. त्यामुळे या लढतीतही त्यांच्याकडून अपेक्षा असतील. * पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ व हसन अली यांच्यावर असेल. तर, लेग-स्पिनर शादाब खानला आपली कामगिरी उंचवावी लागेल.