भ्रमणध्वनी साहित्य विक्री आणि दुरुस्तीच्या व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या मुद्यावरून शहरात मराठी आणि अमराठी व्यावसायिकांमध्ये उद्भवलेल्या वादात मनसेने काही अमराठी व्यापाऱ्यांच्या दुकानावरील भ्रमणध्वनी दुरुस्तीचे फलक उतरवत संबंधितांना समज दिली.
नाशिक – भ्रमणध्वनी साहित्य विक्री आणि दुरुस्तीच्या व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या मुद्यावरून शहरात मराठी आणि अमराठी व्यावसायिकांमध्ये उद्भवलेल्या वादात मनसेने काही अमराठी व्यापाऱ्यांच्या दुकानावरील भ्रमणध्वनी दुरुस्तीचे फलक उतरवत संबंधितांना समज दिली. अमराठी व्यावसायिकांनी दुरुस्तीचे काम करू नये. साहित्याच्या दरात तफावत पडू नये म्हणून दरपत्रक निश्चित करावे, असा तोडगा तूर्तास काढण्यात आला. संबंधितांनी असहकार्य केल्यास मराठी युवकही घाऊक साहित्य व्यवसायात शिरतील, असा इशारा मनसेने दिला.
महात्मा गांधी रस्त्यावरील भ्रमणध्वनी साहित्य व दुरुस्तीच्या बाजारपेठेत अमराठी आणि स्थानिक मराठी व्यावसायिकांमध्ये वादाची ठिणगी पडली. अमराठी व्यावसायिकांनी भ्रमणध्वनी दुरुस्तीतही शिरकाव केल्यामुळे हे काम आधीपासून करणाऱ्या मराठी तरुणांच्या रोजगारावर गदा आल्याची तक्रार करुन मनसेने या वादात उडी घेत एकाधिकार राखता येणार नसल्याचे बजावले होते. अमराठी व्यावसायिकांनी दोन दिवस आपली दुकाने बंद ठेवत दुरुस्तीचे काम करणाऱ्या मराठी व्यावसायिकांची कोंडी केली. भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प झाले. बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी कार्यकर्त्यांसह परिसरात भेट दिली. ज्या साहित्य विक्रीच्या दुकानावर भ्रमणध्वनी दुरुस्तीचे फलक होते, यातील तीन, चार फलक त्यांनी हटवले. उर्वरितांना ते काढण्याची सूचना करण्यात आली. या वादावर सामंजस्याने तोडगा निघाल्याचे जाहीर करण्यात आले.
भ्रमणध्वनींच्या घाउक-किरकोळ साहित्य विक्रीत अमराठी व्यापाऱ्यांंचे वर्चस्व आहे. कमी किंमतीत माल मिळाल्याने ते अल्प दरात विक्री, दुरुस्ती करून देतात. यामुळे शेकडो मराठी युवकांवर उपासमारीची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले. याबाबत राजस्थानी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. काही अमराठी व्यावसायिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली. घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ साहित्य विक्री केली तरी एकाच दरात मालाची विक्री करावी. यासाठी दरपत्रक तयार करावे. त्यांचे सहकार्य न मिळाल्यास मराठी व्यावसायिक घाऊक व्यवसायातही शिरतील, असे पवार यांनी सूचित केले.
ग्राहकांना मारहाण, पोलिसांचे दुर्लक्ष
भ्रमणध्वनी साहित्याच्या बाजारपेठेत अमराठी व्यावसायिकांची दादागिरी आहे. काही कारणावरून वाद झाल्यास हे व्यावसायिक क्षणार्धात एकत्र येतात. ग्राहकाला बेदम मारहाण करतात. अशा अनेक घटना आजवर घडल्या आहेत. मात्र पोलीस दोषींवर कारवाई करण्याऐवजी संबंधित व्यावसायिकांना पाठिशी घालत असल्याची मराठी व्यावसायिकांची तक्रार आहे. एका अमराठी व्यावसायिकाबाबत नुकतीच महिला ग्राहकाने तक्रार केली होती. याची माहिती मिळाल्यानंतर त्याला मनसेच्या पद्धतीने समजावण्यात आले. इतर व्यावसायिक ग्राहकांशी योग्य प्रकारे वागतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.