अमली पदार्थांच्या विरोधात ठाकरे गटाचा भव्य मोर्चा – शहरातील आमदारांना हप्ते मिळत असल्याचा संजय राऊत यांचा आरोप

मालेगावमध्ये अमली पदार्थांचे जाळे कोण चालवते, त्याची सूत्रे नांदगावपर्यंत गेली असून गृहमंत्र्यांनी या मुद्यांवर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले.

नाशिक – अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आजवर १०० हून अधिक मुलांनी आत्महत्या केल्या. माफिया शहरातील आमदारांना किती हप्ते देत होते, पालकमंत्र्यांचे मालेगाव ते नांदगावच्या आमदारापर्यंत काय पाठविले जात होते, हे सर्व नोंदीत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. नशेच्या बाजारात नाशिकसह राज्यातील युवापिढी उद्ध्वस्त होत आहे. कोणाला किती हप्ते मिळत होते, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ज्ञात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुजरातमध्ये कोट्यवधींचे अमली पदार्थ पकडले जातात. जे पकडले जात नाही, त्यांची नाशिकमध्ये विक्री होत असून त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न करीत राऊत यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले.

अमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खासदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाद्वारे ठाकरे गटाने पालकमंत्री दादा भुसे, नांदगावसह नाशिक शहरातील आमदारांवर हप्तेखोरीचे आरोप केले. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असून एक मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार गट) ताब्यात आहे. राऊत यांनी भाजपच्या आमदारांचा स्पष्ट नामोल्लेख केला नसला तरी हप्तेखोरीचा संबंध महिलेशी जोडत काही प्रश्न केले. शालिमार येथील कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महायुती सरकार, पालकमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मध्यवर्ती भागातून मार्गक्रमण करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राऊत यांंचे भाषण झाले. आम्ही बोलायला लागलो तर, विषय घर, पक्षापर्यंत जाईल, असा इशारा त्यांनी गृहमंत्र्यांना उद्देशून दिला. पालकमंत्री नशेची गोळी खाऊन बसले आहेत. मालेगावमध्ये अमली पदार्थांचे जाळे कोण चालवते, त्याची सूत्रे नांदगावपर्यंत गेली असून गृहमंत्र्यांनी या मुद्यांवर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले.

पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

शहर परिसरात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना प्रशासन आणि पोलिसांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने मोर्चाद्वारे केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना राऊत यांनी निवेदन दिले. शाळा, महाविद्यालय परिसरात सर्वत्र मुक्तहस्ते अमली पदार्थ मिळत असून प्रशासन व सरकार काही करत नसल्याचा शैक्षणिक संस्था आणि नागरिकांना संशय आहे. प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

मोर्चाच्या कारणाबद्दल सहभागी अनभिज्ञ

मोर्चात महाविद्यालयीन युवक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. मोर्चाला गर्दी जमली असली तरी मोर्चा नेमका कोणत्या कारणासाठी काढण्यात आला, याबद्दल अनेक महिला अनभिज्ञ होत्या. पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातून शक्य तेवढी गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया