अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

साधारणत: दीड आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाचे सोमवारी दुपारी जोरदार पुनरागमन झाले. अवघ्या अर्धा ते पाऊण तासात शहरातील रस्त्यांनी पाण्याचे पाट वाहू लागले.

नाशिक – साधारणत: दीड आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाचे सोमवारी दुपारी जोरदार पुनरागमन झाले. अवघ्या अर्धा ते पाऊण तासात शहरातील रस्त्यांनी पाण्याचे पाट वाहू लागले. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागरिकांसह छोट्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी तुडूंब भरल्याने त्यांचे पाणी वाहून गोदापात्रात आल्याचे पहायला मिळाले.

शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्टच्या प्रारंभी सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर अनेक भागातून तो गायब झाला. तीन, चार दिवसांपासून तर अक्षरश: उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. सोमवारी सकाळी हीच स्थिती होती. दुपारनंतर वातावरण बदलले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कमी वेळात धो धो पाऊस झाल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणीच पाणी झाले. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा गाजावाजा झालेल्या सराफ बाजार, दहीपूल तसेच गोदाकाठावरील लहान-मोठ्या गल्ल्यांमध्ये हीच स्थिती होती. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी झाली. खड्डे आणि पाणी यातून वाहनधारकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत होते. अकस्मात जोरदार पाऊस आल्याने छोट्या विक्रेत्यांची धावपळ उडाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूलावरील एका मार्गिकेवर पाणी साचल्याने एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती. पाऊस थांबल्यानंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

कमी वेळात मुसळधार पाऊस झाल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी तुडूंब भरून वाहू लागल्या. गोदाकाठ परिसरातील गटारींचे पाणी थेट नदीपात्रात येऊन मिसळत होते. गोदावरीत सांडपाणी जाऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये स्मार्ट सिटी कंपनीने खर्च केले. स्थानिकांनी कंपनीला सहकार्य केले. परंतु, मध्यम स्वरुपाच्या पावसातच गटारी तुडूंब भरून ओसंडून वाहिल्या. भुयारी गटारींची क्षमता वाढवून नेमके काय साध्य केले, असा प्रश्न गोदाप्रेमी देवांग जानी यांनी उपस्थित केला.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

इगतपुरीत सर्वाधिक पावसाची नोंद

सोमवारी सकाळी साडे आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरीत ३५.९, नांदगाव तालुक्यात २४.९, येवल्यात १७.७, सिन्नर ९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येवला, बागलाण, मालेगाव, नाशिक आणि निफाड तालुक्यात तुलनेत त्याचा जोर कमी होता. शहरात ही कसर दुपारी भरून निघाली.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा