अलिबाग : ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन

अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

अलिबाग- अलिबाग वेश्वी येथील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या ९० दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. तलावातून तब्बल १.७५ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला असून, या वर्षी तलावात १७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा होऊ शकणार आहे. त्यामुळे वेश्वी, सह आसपासच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सामाजिक संस्थाच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळेश्वर तलावातून पूर्वी अलिबाग आणि अलिबागच्या आसपासच्या परिसरास पाणीपुरवठा केला जात होता. मात्र नंतर एमआयडीसीकडून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर तलावातून पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे तलावाच्या देखभालीकडे हळूहळू दुर्लक्ष होत गेले. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवण क्षमता कमी होत केली. जलपर्णीचा विळखा तलावाला पडला त्यामुळे ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाला अवकळा प्राप्त झाली होती. उन्हाळ्यात जेमतेम दोन ते तीन फूट पाणीसाठा तलावात शिल्लक राहात होता. दुषित जलस्त्रोतांमुळे या पाण्याचाही कुठल्याच प्रकारे वापर होत नव्हता. निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हीबाब लक्षात घेऊन तलावाचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

देशभरात २० हून अधिक तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या आनंद मलींगवाड यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन संस्था आणि कंपन्यांनी या कामासाठी आर्थिक मदत पुढे केली. मार्च महिन्यात तलावाच्या खोलीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री लावून तलावातील गाळ काढला गेला. खोलीकरण करून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे हे काम अवघ्या नव्वद दिवसांत पूर्ण केले. या कामामुळे ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाला गतवैभव प्राप्त झाले आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली आहे. आता नैसर्गिक अधिवास जपत तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. ज्यामुळे तलावाच्या परिसरात पक्षांचा अधिवास वाढवण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. खोलीकरणातून निघालेला गाळ हा तलावाच्या भोवती बंदिस्तीसाठी वापरण्यात आला. तसेच हे काम करताना कुठेही सिमेंटचा वापर केला गेलेला नाही.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

पर्यावरण पुरक संवर्धन व सुशोभिकरण

सुरवातीला तलावातील पाणी उपसून तलाव कोरडा करण्यात आला. नंतर गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. तलावातून गाळ काढून त्याची मध्यभागी खोली २० फुटांपर्यंत वाढविण्यात आली. तलावाच्या मधोमध पक्षांसाठी एक बेट तयार करण्यात आले. तलावाचे तीन विभाग करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणि गुरं आणि जनावरांना पिण्यासाठी स्वंतत्र भाग तयार करण्यात आला.

तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे. तलावाच्या आतील भागात उतारावर माती वाहून जाऊ नये यासाठी वडेलिया या फुलझाडांची लागवड केली. तसेच तलावातील पाण्याचे तपमान वाढू नये यासाठी आतील बाजूस दगडांचा वापर केलेला नाही. पावसाळ्यानंतर तलावाच्या आसपासच्या परिसरात पाच हजार स्थानिक वृक्षांची लागवड करणार आहोत. ज्यामुळे तलावपरीसरात पक्षी, मधमाश्या आणि फुलपाखरांचा अधिवास वाढण्यास मदत होणार. – आनंद मलिंगवाड, प्रकल्प संचालक, तलावांचे अभ्यासक

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

तलावाच्या बाजूच्या बंधार्‍यावर नागरिकांना चालण्यासाठी रस्ता व लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हा परिसर आगामी काळात पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठरू शकेल. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्याचा मानस असून ते कामही सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोकुळेश्वर मंदिर परिसराचा जिर्णोद्धारही आम्ही करणार आहोत. – गणेश गावडे, सरपंच