अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आज भुमिपुजन; शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यक्रम

या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पध्दतीने, तर उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे.

अलिबाग येथील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचा भुमिपूजन सोहळा मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पध्दतीने, तर उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडणार आहे.

 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनी अलिबाग येथे यावर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. आरसीएफ कुरूळ येथील वसाहतील तात्पुरत्या स्वरुपात यावर्षीपासून १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे. महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयासाठी अलिबाग तालुक्यातील उसर येथील ३२ एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत आणि ५०० खाटांचे सर्वोपचार रुग्णालयाची इमारत बांधली जाणार आहे. या कामाचा भुमिपुजन समारंभ आज पार पडणार आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

“शासकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण होईल. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नविन कवाडे उघडी होणार आहेत. त्याच बरोबर जवळपास साडे आठशे खाटांची सुसज्ज रुग्णालय सुविधा अलिबाग परिसरासाठी उपलब्ध होईल,” अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री  आदिती तटकरे यांनी दिली.

दरम्यान, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.