अवकाळी पावसाने झोडपले

चौकांमध्ये पाणीच पाणी; अनेक भागात वीज पुरवठा खंडित

चार, पाच दिवसांपासून ढगाळ हवामानात राहिलेल्या नाशिककरांना गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने झोडपले. एक ते दीड तास त्याने जोरदार हजेरी लावली. थंडीच्या हंगामात अकस्मात झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सखल भागात, रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये पाणी साचले. महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली.  पावसामुळे पंचवटी, सिडकोसह अनेक भागातील वीज पुरवठा अनेक तास खंडित झाला होता. जिल्ह्य़ातील सिन्नर, आडगाव, जानोरी यासह निफाड

तालुक्यातील काही गावांमध्येही पाऊस झाला. पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नववर्षांच्या प्रारंभीच वातावरणात बदल झाले होते. ढगाळ हवामानात थंडी गायब झाली. सलग चार दिवस हे वातावरण कायम राहिले. गुरूवारी दुपारी विजांच्या गडगडाटासह शहरासह जिल्ह्य़ातील काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काही वेळात तो थांबेल असे वाटत होते. परंतु, तसे घडले नाही. उलट त्याचा जोर वाढला. कुठे अर्धा ते पाऊण तास तर कुठे तासभर जोरदार पाऊस झाला.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

अकस्मात आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मोठय़ा प्रमाणावर विवाह सोहळे असल्याने वऱ्हाडींची गैरसोय झाली. सखल भागात, रस्त्यांवर पाणी साचले. पंचवटीत के . के . वाघ महाविद्यालय ते हॉटेल जत्रादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पावसामुळे वाघ महाविद्यालयासमोर, कन्नमवार पूल, व्दारका चौक येथे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले. व्दारका चौकात तर वाहतूक पोलीसही उपस्थित नव्हते.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

त्यामुळे वाहनधारक सिग्नलच्या सूचनेची पर्वा न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडत होती. महामार्गावर ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकी बंद पडत होत्या.

पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. पंचवटीतील अमृतधाम, बळीमंदिर परिसरात दुपारी दोनपासून गायब झालेली वीज सायंकाळनंतर आली. सिडकोसह अनेक भागात वीज गायब झाली होती. मागील काही दिवसांत आधी कमालीचा गारठा, मग ढगाळ हवामान आणि आता अवकाळी पाऊस असे विचित्र बदल झाले. ही स्थिती विविध आजारांना निमंत्रण देणारी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पिकांना फटका बसण्याची चिन्हे

ग्रामीण भागात जानोरी, आडगाव, सिन्नरच्या काही भागास पावसाचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यात पाऊस झाल्याने कांद्यासह द्राक्ष, डाळिंब आदी पिकांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. थंडीचा जोर कमी झाल्याचा फटका गव्हाला बसणार आहे.