अवकाळीने द्राक्ष, कांद्याला फटका

जिल्ह्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

चांदवडला वीज पडून युवकाचा मृत्यू;  दोन हजार शेतकऱ्यांचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदवड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर वेगवेगळय़ा भागात दोन गायी, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाला. अवकाळीने काढणीवर आलेली द्राक्षे आणि उन्हाळ कांद्याला फटका बसला. मंगळवार तसेच बुधवारी झालेल्या पावसात जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात ७६४ हेक्टरवरील द्राक्ष तर ३९८ हेक्टरवरील  कांदा पिकाचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची संख्या १९९२ आहे

ऐन उन्हाळय़ात शहरवासीयांना पावसाचा अनुभव मिळत असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता आहे. सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास शहरातील अनेक भागात तास ते दोन तास मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी सखल भागात तळे साचले. सकाळी १० वाजेपर्यंत सूर्यदर्शनही झाले नाही. त्यानंतर ऊन- सावलीचा खेळ सुरू होता. ढगाळ पावसाळी वातावरण कायम राहिले. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हे वाचले का?  Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम प्रगतिपथावर आहे. बहुतांश बागा परिपक्व अवस्थेत असून त्यांचे अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी पहाटे नाशिक शहरासह ओझर, पिंपळगाव, एकलहरे, निफाड, दिंडोरी, सिन्नर आदी भागात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. एकलहरे येथे पावसात द्राक्षबाग भुईसपाट झाली. अवकाळीने काळय़ा द्राक्षांना अनेक ठिकाणी तडे गेले. निर्यातक्षम द्राक्ष कागदात लपेटून ठेवली जातात. पावसात कागद भिजून द्राक्ष घडांचे नुकसान झाले. कागद काढल्यानंतर त्यांचे नुकसान लक्षात येईल, असे द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी सांगितले.उन्हाळ कांदा तयार होण्याच्या मार्गावर आहे. अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्यासह करंजाडी परिसरात अवकाळी पाऊस, गारपिट झाली. अनेक भागात वीजपुरठा खंडित झाला होता.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

दोन दिवसांत जिल्ह्यातील ११७६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी  विभागाचा अंदाज आहे. यात सर्वाधिक ७६४ हेक्टर द्राक्षाचे क्षेत्र आहे. निफाड तालुक्यात ७०० हेक्टर, दिंडोरीत ५८ आणि सिन्नर तालुक्यात पाच हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. सटाणा तालुक्यातील १४० आणि सिन्नर तालुक्यातील २४३ अशा एकूण ३९८ हेक्टरवरील कांद्याला अवकाळीची झळ बसली. तसेच  ११ हेक्टरवरील गहू आणि  १.४० हेक्टर वरील भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. अवकाळीचा फटका १९९२ शेतकऱ्यांना बसला आहे. यात निफाड तालुक्यातील १४०१, सिन्नर २१५, दिंडोरी १२४, सटाणा २४६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या पावसानंतर मनमाडसह अनेक भाग अंधारात बुडाला.  काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याची माहिती हाती आली आहे. त्यातच मुंबईत आयोजित महावितरण कर्मचाऱ्यांच्या मोर्चासाठी कर्मचारी गेल्याने महावितरणच्या अनेक कार्यालयात शुकशुकाट होता.

पशुधनाचेही नुकसान

वीज पडून चांदवड तालुक्यातील कैलास कवडे (३५) यांचा मृत्यू  झाला. मनमाड येथे घरांची पडझड झाली. नांदगाव, बागलाण व येवला तालुक्यात दोन गायी, एक म्हैस, दोन बैल या पशुधनाची हानी झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

द्राक्ष खुडणी थांबली

अवकाळी पावसाने द्राक्ष बागांमधील काढणीचे काम थांबविण्यात आले आहे. अवकाळीचे दुष्परिणाम लक्षात येण्यास दोन ते तीन दिवस लागतील. तोपर्यंत व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे. निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्यातील बहुतांश बागा काढणीच्या टप्प्यात आहेत. पावसाने काळय़ा द्राक्षांना तडे जाण्याची तर कागदात लपटलेले द्राक्ष घड खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.