मंगळवारी आंदोलनाला सुरुवात झाली होती. यामुळे नोटांच्या छपाईसह अन्य कामे ठप्प झाली.
नाशिक : विविध मागण्यांसाठी नाशिकरोड येथील प्रतिभूती मुद्रणालय तसेच चलार्थ मुद्रणालय येथे मंगळवारी कामगारांनी बेमुदत काम बंदची हाक दिली. एक दिवसाच्या बंदनंतर व्यवस्थापनाने आश्वासन दिल्याने आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले. त्यामुळे दोन्ही मुद्रणालयांमधील कामकाज पूर्ववत सुरू झाले.
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत काम बंद करण्याचा इशारा मुद्रणालयातील मजदूर संघ, स्टाफ युनियन, एससीएसटी असोसिएशन या संघटनांनी घेतला होता. मंगळवारी आंदोलनाला सुरुवात झाली होती. यामुळे नोटांच्या छपाईसह अन्य कामे ठप्प झाली. मंगळवारी रात्री उशिरा चलार्थ मुद्रणालयाचे व्यवस्थापन आणि मजदूर संघ यांच्यात बैठक झाली. संघटनेशी चर्चा करून निर्णय घेतले जातील, कामगारांच्या सेवाशर्तींना धक्का लावणार नाही, नोटा चोरी प्रकरणातील निलंबित कामगारांना लवकरच कामावर घेतले जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.बैठकीस मजदूर संघाचे जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वार जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, मुद्रणालयाचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, एस. महापात्रा, सहाय्यक महाव्यवस्थापक वाजपेयी, नवीन कुमार, अर्पित धवल, दीपक पडवळ, स्टाफ युनियनचे सरचिटणीस अभिजित आहेर, दीपक शर्मा, मनोज चिमणकर हे उपस्थित होते.