छगन भुजबळ म्हणाले होते, “मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावं.
“त्यांच्या (मराठा आंदोलक) झुंडशाहीसमोर नमते घेऊन सरकारने त्यांना मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू केलं आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यांमुळे भटके-विमुक्त, वंचित, ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे”, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयात दाद मागणे, आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत.” दरम्यान, भुजबळ यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊ पाहणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावं. जरांगे पाटलांएवढी दुसरी ज्ञानी व्यक्ती देशात नाही. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपवण्याचे काम करून दाखवावं.” दुसऱ्या बाजूला भुजबळांच्या या आव्हानावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पुण्यातल्या मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी जरागे पाटील म्हणाले, आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं.
मनोज जरांगे म्हणाले, माझी त्यांना (छगन भुजबळ) पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी अव्हानं देऊ नये. कारण, आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं करायचं नाही. कोणाच्याही मुलांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत. आम्हीसुद्धा पुराव्यांशिवाय बोलत नाही. मला असं वाटतं की, महाराष्ट्रातल्या ओबीसींनी भुजबळांना समजून सांगावं, तुमच्या राजकीय स्वर्थासाठी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नका. भुजबळांना ओबीसींची काळजी नाही. त्यांना केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मी मागे एकदा भुजबळांना धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. अद्याप त्यांनी त्याबाबतची भूमिका भूमिका स्पष्ट केलेली नाही. ओबीसीत १२ बलुतेदार जाती आहेत, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू दिला जात नाही. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की ओबीसीत त्यांचा वेगळा प्रवर्ग तयार करावा. आमचा त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमची मागणी आहे. छगन भुजबळ अशी आव्हानं देऊन आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सगळं आरक्षण घालवून बसतील. मी त्यांना इतकंच सांगेन की, उगाच आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा काहीही होऊ शकतं.