आरोग्य विद्यापीठाचा पाच कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मंजूर

संशोधन, विकास कामांवर भर

संशोधन, विकास कामांवर भर

नाशिक : येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २०२१-२२ वर्षांसाठी ४.९१ रुपयांची तूट असलेला ३५१.२५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. आगामी वर्षांत ३५६.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सोमवारी विद्यापीठाची अधिसभा बैठक कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी डॉ. सचिन मुंबरे यांनी अर्थसंकल्प तर लेखा अहवाल डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सादर केला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचालन केले. संशोधन, विकास कामांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.

विद्यार्थी कल्याणकारी योजनेसाठी पाच कोटी, अवयवदान, कुपोषण आणि स्वच्छमुख अभियान आदींसाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित माहिती, योजनांची सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाने खास अ‍ॅप तयार केले आहे. ते अधिक अद्ययावत करण्यासाठी अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली. विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासह संशोधन, विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ऐरोली येथील बांधकाम, नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील जमीन खरेदी, बांधकामे आदींचा समावेश आहे.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

विद्यापीठ, विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ‘ई लर्निग’ केंद्र उभारून ई मार्गदर्शन मालिकेच्या आयोजनासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे विविध प्राधिकरण सदस्यांचा बैठकांमध्ये सहभाग वाढविण्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. करोना सुरक्षा कवच योजनेसाठी बाधित विद्यार्थ्यांला उपचारासाठी एक लाखापर्यंत मदत किंवा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये मदतीची तरतूद करण्यात आली आहे. अधिसभेतर्फे कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल डॉ. म्हैसेकर यांचा सत्कार करण्यात आला.

हे वाचले का?  देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र संशोधन कक्ष

आरोग्य विद्यापीठात संशोधन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांनीदेखील याच धर्तीवर स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील संशोधन विभागात समन्वय राखून संशोधनास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अर्थसंकल्प नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यापीठाकडून ज्ञान संवर्धन करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन, विविध विषयांवर व्याख्यानमाला, कल्याणकारी योजना, संशोधन कार्यशाळा, विद्यार्थी अ‍ॅप, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार आणि संवाद कौशल्य आदींवर प्रभावी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.