आरोग्यसेवेचा वसा!

सुरुवातीला इंदिराबाईंना लोकांच्या नाराजी, नापसंती, प्रसंगी हीन दर्जाचे टोमणे, टीका-टिप्पणीला सामोरं जावं लागलं.

कोकणासारखा मागास प्रांत आरोग्यसेवेबाबतही नेहमीच दुर्लक्षित. या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून इंदिराबाई हळबे यांनी साडेसहा दशकांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखमध्ये मातृमंदिर संस्था स्थापन केली.  कालांतराने बालवाडी, अनाथालय, तंत्रशिक्षण विद्यालय, कृषी तंत्रशिक्षणाची दारे खुली करणाऱ्या या संस्थेचा गाभा मात्रा आरोग्यसेवा हाच राहिला. बहुविध समाजोपयोगी उपक्रमांचे केंद्र ठरलेल्या या संस्थेचे प्रत्येक कार्य इंदिराबाईंच्या व्रतस्थपणाची साक्ष देते.

कोकणातले पावसाळ्याचे दिवस. धो-धो पाऊस पडत होता. संगमेश्वर तालुक्यातल्या कुठल्या तरी दुर्गम गावात एक गर्भवती विवाहिता अडली होती. तिच्या बापाने धावत-पळत देवरुख गाठलं. इथल्या एक तरुण, प्रशिक्षित बाई हे काम यशस्वीपणे करतात,असं त्याला कळलं होतं. त्याने त्यांचं घर गाठलं. त्यापूर्वी थोडा वेळ आधी, अशाच एका प्रसूतीसाठी सुमारे १८ मैल चालून आलेल्या बाई थकल्याने खुर्चीत विसावल्याहोत्या. पुन्हा भर पावसात चिखल तुडवत जाण्याचं त्राण राहिलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी नकार दिला. पण, त्या बापाच्या चेहऱ्यावरचे आर्जवी भाव त्यांना स्वस्थ बसू देईनात. त्या तशाच उठल्या आणि चपलांमध्ये पाय सरकवत त्याच्याबरोबर निघाल्या. एव्हाना अंधार पडला होता. कंदिलाच्या उजेडात पायांनी वाट चाचपडत बाई वाडीवरच्या घरात पोहोचल्या. आतमध्ये ती गर्भारशी वेदनेने विव्हळत होती. एकूण परिस्थितीचा अंदाज घेत बाईंनी कौशल्य पणाला लावलं. थोड्याच वेळात त्या छोट्याशा घरामध्येबाळाचा पहिला ट्याहा घुमला. पोरीच्या बापाचा चेहरा फुलला. एव्हाना मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर पाऊस पडतच होता. घरातल्या माणसांनी रात्री मुक्काम करण्याचा आग्रह केला. पण बाईंचे नियम कठोर. त्या माघारी निघाल्या आणि पहाटेपर्यंत चालत देवरुखला घरी पोहोचल्या.

हा प्रसंग सुमारे ६५-७० वर्षांपूर्वीचा. परिचारिकेचं प्रशिक्षण पूर्ण करून इंदिराबाई हळबे नावाच्या तरुण, विधवा बाई संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखमध्येराहू लागल्या होत्या. या दुर्गम भागातल्या अडाणी, गरिबांना चांगली आरोग्य सेवा द्यावी, हे एकच ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं. ज्ञान आणि निष्ठेच्या मिलाफामुळे त्यांच्या उपचारांना गुण येत होता. काही काळ अशा प्रकारे घरोघरी जाऊन रुग्णसेवा केल्यानंतर त्यांच्या या खडतर वाटचालीतली जिवाभावाची मैत्रीण चंद्राताई ऊर्फ माई किर्लोस्कर यांच्या सहकार्याने इंदिराबाईंनी १९५४ च्या जानेवारी महिन्यात देवरुखला चक्क एका गोठ्यामध्ये दोन खाटांचं रुग्णालय सुरू केलं.

हे वाचले का?  Praniti Shinde : “…तर ८० टक्के महिलांवर होणारे अत्याचार थांबतील”, खासदार प्रणिती शिंदेंचं परखड मत

अर्थात हे अचानक घडलं नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या रुढी-परंपरेनुसार तेराव्या वर्षी विवाह झालेल्या इंदिराबाई, त्यानंतरच्या अवघ्या दहा-बारा वर्षांत तीन कन्या आणि पतीच्याही अकाली निधनामुळे ऐन पंचविशीत अगदी कोलमडून गेल्या. मध्यंतरी काही काळ देवरुखात वास्तव्य असताना भास्कर आठल्ये, गोविंदराव शिंदे, भाऊ तेंडुलकर इत्यादी राष्ट्र सेवा दलाच्या बिनीच्या तरुण कार्यकर्त्यांशीत्यांचा संपर्क आला होता. या धक्क्यातून त्यांना सावरण्यासाठी या मंडळींनी पुढाकार घेतला. सानेगुरुजींच्या उपस्थितीत आयोजित सेवा दलाच्या शिबिरात इंदिराबाईंना सहभागी केलं आणि तिथेच त्यांना जणू जीवनहेतू उमगला. प्राथमिक शिक्षणसुद्धा धड पूर्ण न झालेल्या इंदिराबाईंनी केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर नागपूरला कमलाताई होस्पेट यांच्या मातृसेवा संघात परिचारिकेचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम प्रावीण्यासह पूर्ण केला आणि त्यानंतर देवरुखमध्ये येऊन रुग्णालय सुरू केलं.

सुरुवातीला इंदिराबाईंना लोकांच्या नाराजी, नापसंती, प्रसंगी हीन दर्जाचे टोमणे, टीका-टिप्पणीला सामोरं जावं लागलं. पण विचाराच्या पक्क्या असलेल्या इंदिराबाईंनी त्यांना खंबीरपणे तोंड देत आपलं कार्य नेटाने चालू ठेवलं.  त्यामुळे इथे उपचार घेणाऱ्यांची संख्या स्थापनेनंतर पुढील १५ वर्षांच्या काळात अडीच-तीन हजारांवर गेली. गौर वर्णाच्या, ठेंगण्या, डोळ्यावरचा चष्मा सावरत प्रत्येकाशी आत्मीयतेने बोलणाऱ्या इंदिराबाईं सर्वांसाठी प्रेमळ ‘मावशी’ झाल्या. त्यांच्या ठायी असलेला दूरदृष्टीपणा, व्यवस्थापन कौशल्य, योजकता व दांडग्या जनसंपर्कामुळे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत (१९७८-७९) ४० खाटांचं सुसज्ज रुग्णालय उभं राहिलं. रुग्णालयासाठी जागा दिलेले ल. ग. राजवाडे, मंजुळा व वामनराव भिडे, डॉ. पी. व्ही. मंडलिक, लीला व पीटर अल्वारिस, संगमेश्वरचे ज्येष्ठ व्यापारी यशवंतराव भिडे इत्यादींचं या वाटचालीत  मावशींना वेळोवेळी भक्कम पाठबळ मिळालं. आता इथे वर्षाकाठी काही हजार बाह्यरुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण दाखल होऊ लागले होते. त्याचबरोबर, प्रतिवर्षी दोन-तीनशे शस्त्रक्रिया आणि प्रसूती!

रुग्णालय सुरू झाल्यानंतर जन्मलेल्या बालकांचा शारीरिक-मानसिक-बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होण्यासाठी बालवाडीसारख्या उपक्रमाची गरज मावशींना जाणवू लागली होती. लगेच त्यादृष्टीने जुळणी होऊन १९५६ मध्ये ‘प्रसाद बालक मंदिर’ ही देवरुखमधील पहिली बालवाडी सुरू झाली. त्यानंतर अनेक गावांमध्ये बालवाड्यांची साखळीच निर्माण झाली. मातृ मंदिरच्या बालवाडीत आजही सुमारे ७० बालकं शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवत आहेत.

हे वाचले का?  सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल

एका संध्याकाळी मावशी काही तरी काम करत बसल्या असताना कुणी तरी अनोळखी व्यक्तीने एक अर्भक त्यांच्या हाती आणून दिलं. मावशी त्याला आतमध्ये नेऊन तपासत असताना ती व्यक्ती निघूनही गेली. त्यामुळे त्या बाळाच्या संगोपनाची जबाबदारी मावशींवर पडली. त्यातूनच १९६४ मध्ये ‘गोकुळ’ या अनाथालयाचा जन्म झाला. अजाणतेपणाने किंवा असाहाय्यतेतून मातृत्व लादल्या गेलेल्या कुमारिका, विधवा स्त्रिया किंवा काही कारणाने माता-पित्याचं छत्र गमावलेल्या  मुला-मुलींसाठी तो मोठा आधार बनला. ‘गोकुळ’ आजही अशा मुलींसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे.

या अनाथालयात मोठ्या होणाऱ्या आणि तालुक्यातल्या इतर मुलांनाही तंत्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याच्या हेतूने मातृमंदिरपासून जवळच साडवली इथे १९८१ मध्ये इंदिरा म. बेहरे तंत्रशिक्षण विद्यालय सुरू करण्यात आलं. आजही इथे मेकॅनिक, टर्नर, फिटर, वेल्डर आणि वायरमन हे अभ्यासक्रम शिकवले जात असून सुमारे ७० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या विकासात पुण्याच्या वनाझ कंपनीचं सुरुवातीपासून मोलाचं योगदान राहिलं आहे. यातील विशेष बाब म्हणजे, सध्या या संस्थेचेप्राचार्य असलेले समीर हेगशेट्ये यांचंही बालपण ‘गोकुळ’मध्येच गेलं आहे.

इंदिराबाईंनी देवरुखजवळ ओझरे इथे २४ एकर शेतजमीन घेतली. १९७० च्या दशकात सामाजिक चळवळींमध्ये पुढाकार घेतलेले तरुण विजय नारकर यांनी मातृमंदिरच्या कामामध्ये सहभागी होऊन या क्षेत्राचा उत्तम प्रकारे विकास केला.  विजूभाऊंनी शेतीसह पाणलोट विकास, १०० गावांमध्ये पाणी योजना इत्यादी उपक्रम धडाडीने राबवत संस्थेच्या कार्याला नवा आयाम दिला. त्यातून रुग्णालय आणि तांत्रिक शिक्षणाच्या जोडीने शेतीविषयक पदविका अभ्यासक्रमाची प्रा. मधु दंडवते कृषी तंत्रनिकेतन ही संस्था २००८ मध्ये सुरू करण्यात आली. या विद्यार्थ्यांसाठी शेतावरच वसतिगृहाची सोय केलेली आहे. मावशींच्या छायेत वाढलेल्या विजूभाऊंच्या पत्नी शांताबाईंनी संस्थेच्या कामामध्ये वाटा उचलत तालुक्यात महिला बचत गटांचं जाळं निर्माण केलं असून आजही त्यापैकी सुमारे ७०-७५ गट कार्यरत आहेत.

व्यक्तिकेंद्रित संस्थेला त्या व्यक्तीबरोबरच अस्तंगत होण्याचा शाप असतो, हे मावशींनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी विजूभाऊंच्या रूपाने उत्तराधिकारी तयार केला. त्यानंतर आता संस्थेच्या अध्यक्ष पल्लवी कोरगावकर, कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, उपाध्यक्ष विलास कोळपे, सचिव आत्माराम मेस्त्री, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिर्के इत्यादींचा चमू येथील वैद्यकीय सेवेला एकविसाव्या शतकातलं साजेसं रूप देण्याचं स्वप्न उराशी बाळगत ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ अशी ग्वाही देत आहे.  – सतीश कामत

हे वाचले का?  नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

pemsatish.kamat@gmail.com

संस्थेपर्यंत कसे जाल?

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर  एसटी स्टँडजवळ डावीकडे वळल्यानंतर सुमारे १५ किलोमीटर अंतरावर देवरुख शहर आहे. तेथे शिवाजी चौकात डावीकडे वळल्यानंतर जेमतेम अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर मातृमंदिर संकुल आहे.

मातृमंदिर देवरुख (Matrumandir  Devrukh)  या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ‘८०-जी’ करसवलतपात्र आहे.

धनादेश येथे पाठवा… : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय   

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,

प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय     

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय    

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००