आषाढी यात्रेसाठी पंढरीत २७०० पोलिसांचा बंदोबस्त

 प्रशासनाची आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर याही यात्रेवर अनेक निर्बंध सरकारने घातले आहेत.

पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी जवळपास २००० पोलीस कर्मचारी आणि २०० अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेसाठी बंदोबस्ताला येणाऱ्या पोलिसांची आरोग्याची काळजी घेत आरोग्य कीट  देण्यात येणार आहे. तसेच यात्रा कालावधीत पंढरपुरात भाविक येऊ नये म्हणून तीनस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात ठेवणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. आषाढी एकादशी २० जुलै रोजी आहे.

प्रशासनाची आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर याही यात्रेवर अनेक निर्बंध सरकारने घातले आहेत. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर आदी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी प्रमुख १० मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. दशमीला म्हणजेच १९ जुलै रोजी सर्व पालख्या पंढरीत येणार आहेत. २० जुलै रोजी एकादशी तर यंदा सर्व पालख्यांचा मुक्काम पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २४ जुलैपर्यंत पंढरीत मुक्कामी राहणार आहेत. प्रत्येक पालखीसोबत भाविकांची संख्या निश्चिात केली आहे. हे सोडून इतराना पंढरीत यात्रा कालावधीत परवानगी मिळणार नाही.

हे वाचले का?  त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे दिवाळी पाडव्यापासून ऑनलाईन दर्शन सुविधा

संचाबंदीचा प्रस्ताव

पंढरपूर आणि लगतच्या १० गावांत १७ ते २५ जुलै या कालावधीत संचाबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच जिल्हा, तालुका आणि शहर प्रवेशाच्या अशा तीन ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत जवळपास २ हजार पोलीस कर्मचारी तर २०० अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या सर्वांना आरोग्य सुरक्षा संच देणार आहे. यात मुखपट्टी, सॅनिटायझर, औषधे, पेस्ट, ब्रश, रेनकोट देण्यात येणार आहे. दरम्यान, सरकारने ज्या भाविकांना परवानगी दिली आहे. अशा भाविकांनीच पंढरीत यावे. अन्य भाविकांनी यात्रा कालावधीत पंढरपूरला येऊ नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा