‘इस्रो’चे शतकी उड्डाण

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्राो’च्या ‘एनव्हीएस-०२’ या दळणवळण उपग्रहाचे बुधवारी पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
पीटीआयश्रीहरिकोटा

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्राो’च्या ‘एनव्हीएस-०२’ या दळणवळण उपग्रहाचे बुधवारी पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्राो’) दिमाखदारपणे शतकी कामगिरी पूर्ण केली आहे. व्ही नारायणन यांनी १६ जानेवारीला ‘इस्राो’ची सूत्रे हाती घेतल्यानंतरही ही पहिलीच मोहीम आहे.

५०.९ मीटर उंचीचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही-एफ १५) प्रक्षेपक बुधवारी पहाटे ६.२३ या नियोजित वेळेत अवकाशात झेपावले. काळोख्या आणि ढगाळ आकाशात १९ मिनिटे प्रवास केल्यानंतर रॉकेटपासून पेलोड यशस्वीपणे वेगळे झाले. याच्या वरील टप्प्याचे क्रायोजेनिक इंजिन स्वदेशी बनावटीते आहे. यान अवकाशात झेपावल्यानंतर ‘इस्राो’च्या शास्त्रज्ञांनी आनंद साजरा केला.

हे वाचले का?  Mohammad Amaan : कर्णधार मोहम्मद अमानच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने उभारला धावांचा डोंगर, जपानसमोर ठेवले ३४० धावांचे लक्ष्य

‘एनव्हीएस-०२’ हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील (एनएव्हीआयसी) दुसरा उपग्रह आहे. भारतीय भूभागापलीकडे दीड हजार किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ मिळणार आहे. या मोहिमेची २७.३० तासांची उलटगणती मंगळवारी पहाटे २.५३ वाजता सुरू झाली होती. ‘जीएसएलव्ही-एफ-१२’ मधून २९ मे २०२३ रोजी ‘एनव्हीएस-०१’ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. ‘एनएव्हीआयसी’मध्ये दुसऱ्या पिढीच्या पाच उपग्रहांचा समावेश आहे. ‘एनव्हीएस-०१’ पासून ‘एनव्हीएस-०५’ अशी या उपग्रहांची नावे आहेत. या उपग्रहांमुळे अत्याधुनिक यंत्रणा तयार होणार आहे.

हे वाचले का?  Wankhede Stadium: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी

उपग्रहाची वैशिष्ट्ये

● ‘एनव्हीएस-०२’ उपग्रहाची रचना आणि निर्मिती यू. आर. उपग्रह केंद्रामध्ये झाली आहे. २,२५० किलो उपग्रहाचे वजन आहे.

● भूभागावर, हवाई आणि सागरी, कृषी क्षेत्रात अचूक वेळ, वेग सांगण्यासाठी याचा उपयोग होईल. मोबाइलमध्ये लोकेशन अचूक दाखविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ‘इस्राो’च्या या वर्षातील पहिले यशस्वी उड्डाण झाल्याचे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. ‘जीएसएलव्ही-एफ १५’ने हा ‘एनव्हीएस-०२’ हा उपग्रह अपेक्षित कक्षेत सोडला आहे.- व्ही नारायणन, प्रमुख, ‘इस्राो’