भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी ईओएस-०४ या भूनिरीक्षण उपग्रहासह दोन लहान उपग्रहांचे पीएसएलव्ही-सी ५२ क्षेपणास्त्राच्या साहाय्याने अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. २०२२ सालातील या पहिल्याच प्रक्षेपण मोहिमेचे वर्णन इस्रोने ‘अद्भुत पूर्तता’ असे केले.

पहाटेच्या अंधारातच ५ वाजून ५९ मिनिटांनी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे १९ मिनिटांच्या उड्डाणानंतर पीएसएलव्ही या प्रक्षेपण यानाने तिन्ही उपग्रहांना निर्धारित कक्षेत प्रस्थापित केले, त्यावेळी या मोहिमेचे बारकाईने निरीक्षण करत असलेल्या शास्त्रज्ञांनी टाळय़ा वाजवून आनंद व्यक्त केला.
सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी सर्वप्रथम ईओएस-०४ प्रक्षेपण यानापासून वेगळे झाल्यानंतर इन्स्पायरसॅट-१ व आयएनएस-२ टीडी या लहान उपग्रहांनाही त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. मोहिमेचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाल्याचे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी या यशस्वी प्रक्षेपणानंतर सांगितले. अंतरिक्ष खात्याचे सचिव आणि अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच सूत्रे स्वीकाल्यानंतर आजही ही पहिलीच मोहीम होती.
१७१० किलोग्रॅम वजनाचा आणि दहा वर्षांचे आयुष्य असलेला ईओएस-४ हा सर्व प्रकारच्या वातावरणात शेती, वनीकरण व वृक्षलागवड, जलविज्ञान आणि पूर आरेखन यांसारख्या कामांसाठी उच्च दर्जाच्या प्रतिमा मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेला रडार इमेजिंग उपग्रह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल देशातील अंतरिक्ष शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.