ईडी चौकशीवरुन रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाणा; म्हणाले…

भाजपा विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप

ईडीच्या माध्यमातून भाजपा विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी माथाडी कामगार तसंच व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे, मात्र राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल असं यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

“हे मार्केटच पहाटे चार वाजता उघडतं त्यामुळे येथे आलो. सहा वाजता भाजी मार्केट आणि नंतर इतर मार्केट सुरु होतात. हे मार्केट कसं चालतं, याच्यात काय अडचणी आहेत तसंच शेतकरी, व्यापारी, माथाडी कामागर यांच्याबाबतीत असणारे विषय समजून घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत,” अशी माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली. रोहित पवार यांच्यासोबत यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

“आम्ही लोकप्रतिनिधी असतो तेव्हा शेतकरी फोन करत असतात. तीन महिने झाले व्यापाऱ्याकडून पैसे नाही आले, हा व्यापारी दर कमी देत आहे वैगेरे तक्रार करतात. तेव्हा आम्ही त्या एपीएमसी मार्केटच्या प्रमुखांशी बोलून विषय सुटतो का यासाठी प्रयत्न करत असतो,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

“महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडी समीरकरण योग्य पद्धतीने बसू शकते. पण शेवटी तो वाटाघाटीचा भाग असतो. पण काही प्रमाणात तुम्ही पदवीधर आणि विधान परिषद निवडणुका पाहिल्या तर एका ठराविक विचारधारेच्या विरोधात लोकंही आहेत आणि महाविकास आघाडी सरकारही आहे. एकत्रित ताकद मोठी आहे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दाखवून दिलं. त्यामुळे येथेही भाजपाच्या विचारधारेला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढेल. पण शेवटी हे नेते ठरवतील,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

दरम्यान महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, “नोटीस भाजपाच्या लोकांना नाही तर फक्त विरोधकांना आल्या आहेत. भाजपाच्या विरोधकांना नोटीस आल्या आहेत त्याच्यावरुनच समजून घ्या की ईडीचा वापर कशा पद्धतीने होत आहे. उद्या कदाचित मला ईडीची नोटीस येईल.” “सर्वसामान्यांना सुद्ध आता ईडीसारखी संस्था गेल्या पाच वर्षात फक्त राजकीय हेतूने वापरली जात असल्याचं लक्षात आलं आहे. इतकी मोठी संस्था फक्त राजकीय दृष्टीकोनातून वापरली जात जात आहे. त्यात काही निष्पन्न होत नाही,” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका