उद्धव ठाकरेंबरोबर वादाची ठिणगी का पडली? एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘वर्षा’वरील तो प्रसंग; म्हणाले, “मला दोन तास…”

Why was the friction between Eknath Shinde and Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंबरोबर वाद का झाला, याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.

जून २०२२ मध्ये राज्यातील राजकारण ३६० अंशात फिरलं. सत्तेत असलेल्या लोकांनी पक्ष फोडला आणि पुन्हा नवं सरकार स्थापन केलं. शिवसेनेतत झालेली ही बंडखोरी पुढील अनेक वर्षे राजकीय वर्तुळात चर्चेत राहणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं कशावरून वाजलं? पक्षात बंडखोरी करण्याचा निर्णय त्यांनी काय घेतला असा प्रश्न सातत्याने विचारले जातात. टाईम्स ऑफ इंडियाने घेतलेल्या मुलाखतीतही ते बोलत होते.

उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि वाट अनेक तास वाट पाहायला लावली. हे जवळपास दोन वर्ष सुरू होतं. शेवटी, राज्यसभा निवडणुकीवेळी मला यापासून बाहेर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंही काढून घेण्याचा प्रयत्न झाला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. मी त्यांना अनेकदा भाजपाबरोबर जाण्याची विनंती केली. या विनंतीला उद्धव ठाकरेंनी होकारही दर्शवला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली होती. निर्णयासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला गेला. परंतु, याबाबत निर्णय घेण्यापेक्षा त्यांनी भाजपाच्या १२ आमदारांनाच निलंबित केलं.

हे वाचले का?  ६,६०० मेगावॉट वीजनिर्मितीचे कंत्राट ‘अदानी’लाच; ४.०८ रुपये प्रतियुनिट दरामुळे जेएसडब्ल्यू, टोरेंट कंपन्यांवर सरशी

शिवसेना फूट हा कट नव्हता, बंडखोरी होती

उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली नसताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोपही एकनाथ शिंदेंवर केला जातो. यावरही त्यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, “हा कट नव्हता. ही बंडखोरी होती. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान सुरू होतं तेव्हा याचं नियोजन आखण्यात आलं. किंबहुना मी सर्व आमदारांना संजय राऊतांना मतदान करण्याचं आवाहन करून सूरतसाठी निघालो. आम्ही संजय राऊतांना हरवू शकत होतो. पण आम्ही तसं केलं नाही.

हे वाचले का?  भाजपा उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी? श्रीगोंद्यात सुवर्णा पाचपुतेंचा निर्धार, “पक्षाला ताकद दाखवणार”

…पण तेव्हा उद्धव ठाकरेंच्या हातात काही उरलं नव्हतं!

“आम्ही सूरतला पोहोचेपर्यंत आम्हाला खूप कॉल आले. वसईतील एका चहाच्या स्टॉलवरून मी उद्धव ठाकरेंनाही फोन केला. त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफरही दिली. पण आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना म्हणालो. मी खुलेआमपणे बाहेर पडलो होतो. त्यांनी दिल्लीतही कॉल केला होता. शिवसेना आणि भाजपाची युती होऊ शकते, मग एकनाथ शिंदे कशाला पाहिजेत? असंही ठाकरे भाजपाला म्हणाले. पण त्यावेळी त्यांच्या हातात काहीही उरलेलं नव्हतं”, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

जागा वाटपाबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असली तरीही महायुतीच्या जागा वाटपाचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, “जागा वाटपासाठी उशीर झालेला नाही. आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जागा वाटपासाठी वाद झालेला नाही. आम्ही १६ जागांवर निवडणूक लढवणार आहोत. तर, मुंबईतून ३ जागा लढवणार आहोत. २०१९ मध्ये आम्ही ४२ जागा जिंकलो होतो, हा रेकॉर्ड आता आम्ही मोडणार आहोत. सर्वाधिक मताधिक्क्यांनी आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील.”

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान