उद्योजकाची दिवसा हत्या; अंबड औद्योगिक वसाहतीतील घटना; खून, हत्येचे सत्र कायम

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विशेष मोहीम राबवित असताना दुसरीकडे शहरात खून, हत्यांची मालिका कायम राहिल्याची बाब अंबड औद्योगिक वसाहतीत दिवसाढवळय़ा झालेल्या उद्योजकाच्या हत्येने उघड झाली आहे.

नाशिक : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विशेष मोहीम राबवित असताना दुसरीकडे शहरात खून, हत्यांची मालिका कायम राहिल्याची बाब अंबड औद्योगिक वसाहतीत दिवसाढवळय़ा झालेल्या उद्योजकाच्या हत्येने उघड झाली आहे. गरवारे पॉइंट परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता लघू उद्योगाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या संशयितांनी तलवारी, तीक्ष्ण हत्याराने चढविलेल्या हल्ल्यात उद्योजकाचा मृत्यू झाला. यावेळी हल्लेखोराचा वार त्यांच्याही एका साथीदाराला बसून तोही जखमी झाला. त्याला एका रुग्णालयातून ताब्यात घेत पोलिसांनी फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू केला आहे. कारखान्यातून आईला कामावरून काढल्याच्या रागातून उद्योजकावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे उद्योजक आणि  कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरात सोनसाखळी चोरी आणि घरफोडीचे सत्र कायम असताना त्यात महिनाभरात खुनाच्या घटनांची भर पडली. मंगळवारी त्याची पुनरावृत्ती झाली. या घटनेत नंदकुमार निवृत्ती आहेर (५०, महात्मानगर) या उद्योजकाचा मृत्यू झाला. मागील २५ दिवसांतील खुनाची ही आठवी घटना आहे. आहेर कुटुंबाचे औद्योगिक वसाहतीत दोन लघू उद्योग आहेत.

हे वाचले का?  नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

त्यातील गरवारे पॉइंट परिसरातील अहिरे इंडस्ट्रिजच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. नंदकुमार आहेर हे आपल्या स्कॉर्पिओ वाहनातून सकाळी १० वाजता कारखान्यात पोहोचले. वाहन उभे करून ते आतमध्ये जात असताना दबा धरून बसलेल्या चार संशयितांनी तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढविला. यावेळी आवाज झाल्याने कारखान्यातील कामगार आणि सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.कामगारांनी गंभीर जखमी अवस्थेतील आहेर यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अहिरे यांच्या कारखान्यात कार्यरत एका महिलेला कामावरून काढून टाकल्याच्या रागातून उद्योजकावर हल्ला झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे.

जखमी अवस्थेत पकडलेल्या संशयिताकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे हा अंदाज वर्तविला गेला. चार संशयितांमधील एकाची आई त्या कारखान्यात कामाला होती. तिला कामावरून काढून टाकल्याने संशयित अहिरे यांच्या मागावर होते. अहिरे इंडस्ट्रिजसमोर संशयित सकाळपासून त्यांची प्रतीक्षा करत होते, अशी माहिती तपासात उघड झाली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी संशयितावरून उलगडा

चार संशयितांनी आहेर यांच्यावर हल्ला केला, तेव्हा गोंधळात तीक्ष्ण हत्याराचा वार त्यांच्या साथीदारावरही झाला. जखमी अवस्थेत दुचाकीवर त्याला घेऊन ते पळाले. रस्त्यावर त्याच्या रक्ताच्या खुणा दिसत होत्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हा धागा पकडून तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम समाज माध्यमातील डॉक्टरांच्या गटात असा कुणी जखमी उपचार घेण्यास आल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. ही तत्परता कामी आली. संशयितांनी जखमी साथीदारास एका रुग्णालयात सोडून पळ काढला. त्याच्या पायाला पत्रा लागल्याचे कारण दिले गेले. संबंधित डॉक्टरने पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे उद्योजकावरील हल्ल्यानंतर अवघ्या काही तासात पोलीस पहिल्या संशयितापर्यंत पोहोचले. त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पळालेल्या तिघांचे धागेदोरे मिळाले. त्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

अंबड ठाण्याच्या विभाजनावर शासनाचे अजब उत्तर

अंबड औद्योगिक वसाहतीत दिवसाढवळय़ा झालेल्या उद्योजकाच्या हत्येमुळे उद्योजकांसह कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या विभाजनाची वारंवार मागणी करूनही कुठलीही अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार करत आमदार सीमा हिरे यांनी १०० खून झाल्यावर राज्य सरकार या पोलीस ठाण्याचे विभाजन करणार आहे का, असा प्रश्न केला. अंबड औद्योगिक वसाहतीतील घटनेची माहिती समजल्यानंतर हिरे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन आहेर यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. शहरात खुनाची मालिका सुरू असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या विभागाची आवश्यकता आपण वारंवार मांडली. राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी शासनाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांची संख्या व प्रमाण कमी असल्यामुळे पोलीस ठाण्याच्या विभाजनाची गरज नसल्याचे कळविल्याकडे हिरे यांनी लक्ष वेधले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी गस्त वाढवून नागरिकांना संरक्षण देण्यात कुठलीही तडजोड करता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी