उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, दिवाळी खरेदीच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत

पक्षीय उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू राहिली. पक्षीय उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली. दिवाळीच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अनेक जण वाहतूक कोंडीत अडकले. कोंडी दूर करताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागली.

महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी नाशिक मध्य, निफाड मतदारसंघात महायुतीकडून तर, चांदवड मतदारसंघात मविआकडून उमेदवार उशिरा जाहीर करण्यात आले. शहरातील उमेदवारांनी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. नाशिक मध्य मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांनी अशोक स्तंभ ते महात्मा गांधी रोड अशी फेरी काढली. फेरीतील सुशोभित वाहनावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार हेमंत गोडसे यांसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) वसंत गिते, हनिफ बशीर यांनीही अर्ज दाखल केले.नाशिक पश्चिममधून भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे, शशिकांत जाधव यांनी अपक्ष, मनसेचे दिनकर पाटील, माकपचे डॉ. डी. एल. कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. देवळालीतून राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता अशोकस्तंभ ते सीबीएस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

हे वाचले का?  नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद

रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या बहुसंख्य नागरिकांना उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाची पूर्वकल्पना नसल्याने शालिमार, मेनरोड, वकीलवाडी, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूर रोडसह अन्य रस्त्यांवर ते वाहतूक कोंडीत अडकले. कोंडीमुळे पादचाऱ्यांनाही गर्दीतून वाट काढण्यासाठी वेळ लागत होता. दुचाकी धारकांना अर्धा तास एकाच ठिकाणी थांबावे लागत होते.

हे वाचले का?  नाशिक : मौनी अमावास्येमुळे रामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतर ठिकाणाहूनही अधिक कुमक मागविण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी अडथळे उभे केले होते.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी सोमवारचा दिवस निवडला. त्यातच दिवाळीतील खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यामुळे काही अंशी नियोजन कोलमडले. दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाली – चंद्रकांत खांडवी (पोलीस उपायुक्त- वाहतूक)

हे वाचले का?  नाशिक : रखडलेल्या कलाग्रामच्या कामासाठी पुन्हा हालचाली