उष्णतेचा प्रकोप वाढला; उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक ड्युटीवर असलेल्या १८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानासाठी ड्युटीवर गेलेल्या १८ कर्मचाऱ्यांचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ५७ जागांसाठी मतदान पार पडत आहे. मात्र, या मतदानाला तापमानवाढीची झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवस आधीच ठरवून दिलेल्या मतदान केंद्रावर जावं लागतं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कडक उन्हामुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानासाठी ड्युटीवर गेलेल्या १८ कर्मचाऱ्यांचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला आहे.

भारतात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. देशातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्यावर गेला आहे. दिल्लीत तर ५२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच उन्हामुळे मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

हे वाचले का?  Jammu and Kashmir Exit Polls 2024: जम्मू-काश्मीरमध्ये भरघोस मतदान, आता सत्ता कुणाची? Exit Poll कधी येणार?

दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या १८ मतदान कर्मचाऱ्यांचा गेल्या २४ तासांमध्ये उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. यामध्ये बिहारमध्ये उष्णतेमुळे १० मतदान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

मिर्झापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान केंद्रावर तैनात केलेल्या तीन कर्मचाऱ्यांची प्रकृती शुक्रवारी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आता शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं प्रशासनाने सांगितलं. परंतु, या भागातील उष्णतेच्या लाटेमुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्येच आणखी पाच जणांचा मृत्यू झाला.

हे वाचले का?  टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

दरम्यान, रायबरेली आणि सोनभद्र येथेही ईव्हीएम स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच बिहारमध्ये, गेल्या २४ तासांत उष्णतेमुळे मृत्यू झालेल्या १४ लोकांमध्ये १० मतदान कर्मचारी होते. बिहारमधील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं की, माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १० निवडणूक कर्मचारी आणि इतर चार लोकांचा समावेश आहे. यामध्ये भोजपूर जिल्ह्यातील पाच निवडणूक कर्मचारी, रोहतास जिल्ह्यातील तीन निवडणूक कर्मचारी, कैमूर जिल्ह्यातील एक निवडणूक कर्मचारी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक निवडणूक कर्मचारी आणि अन्य चार जणांचा समावेश आहे.