‘एअर इंडिया’चे ‘भरती उड्डाण’ ; ९०० वैमानिक, ४,२०० कर्मचाऱ्यांची पदे भरणार

प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.

नवी दिल्ली : एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. 

वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.  टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण

भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

मनुष्यबळाची गरज का?

‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला ६५०० हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.