एक खिडकी योजनेतून नाशिक शहरात ८०५ मंडळांना परवानगी, गेल्या वर्षीच्या तुलनेत संख्येत वाढ

गणेशाचे आगमन होण्याच्या दिवशी सर्वाधिक ३०० हून अधिक परवानग्या देण्यात आल्या. यंदा मंडळांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे.

नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहर पोलिसांनी उपलब्ध केलेल्या एक खिडकी योजनेतून शहरात तब्बल ८०५ मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी देण्यात आली. गणेशाचे आगमन होण्याच्या दिवशी सर्वाधिक ३०० हून अधिक परवानग्या देण्यात आल्या. मागील वर्षी या योजनेंतर्गत ७९० मंडळांना परवानगी दिली गेली. यंदा मंडळांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे.

शहरात गणेशोत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलिसांनी एकाच छताखाली परवानगी देण्याची व्यवस्था केली होती. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एक खिडकी योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांना गणेश चतुर्थीच्या दिवसापर्यंत नियम व अटी पालनाची हमी घेऊन परवानगी देण्यात आली. एकही अर्ज शिल्लक नाही. या व्यवस्थेमुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना परवानग्यांसाठी फारशी धावपळ करावी लागली नाही. ऐनवेळी देखील परवानगी मिळाली

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून अवघ्या ५३४ मंडळांनीच परवानगी घेतली. गणपती आगमन होण्याच्या दोन दिवस आधी दोन्ही परिमंडळात गणेश मंडळांकडून अर्ज दाखल झाले होते. अनेक मंडळांनी गणपती आगमनाच्या दिवशी परवानगी घेतली. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक खिडकी योजनेंतर्गत परिमंडळ एकमध्ये ३६८ तर परिमंडळ दोनमध्ये ४३७ असे एकूण ८०५ अर्ज प्राप्त झाले होते. या सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात आली. मागील वर्षी शहरात ७९० मंडळांना परवानगी देण्यात आली होती. मंडळांच्या संख्येत यंदा काहिशी वाढ झाली आहे.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त

पोलीस ठाणेनिहाय परवानगी घेणारी मंडळे

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७०, आडगाव ६८, म्हसरूळ ४५, सरकारवाडा २८, भद्रकाली ३९, गंगापूर ५२, मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ६६ याप्रमाणे परिमंडळ एकमध्ये ३६८ सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली. तर परिमंडळ दोनमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ११२ मंडळे, सातपूर ९२, इंदिरानगर ५१, नाशिकरोड ५०, उपनगर ६७ आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६५ अशा एकूण ४३७ मंडळांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे वाचले का?  नाशिक : नाल्यामुळे हर्षवाडीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान