‘एक गाव एक होळी’ची परंपरा कायम

करोनाचा प्रादुर्भाव तरीही आदिवासींमध्ये उत्साह

करोनाचा प्रादुर्भाव तरीही आदिवासींमध्ये उत्साह

वाडा : आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  अनेक गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पुर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. शहरी भागात गल्ली, बोळात होळ्या पेटविल्या जात असल्या तरी ग्रामीण भागात  असलेली  ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा  यंदाही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.

गतवर्षी प्रमाणेच या वर्षीसुद्धा  होळी सणावर करोनाचा प्रार्दुभाव असला तरी येथील आदिवासींमध्ये  होळी उत्सवाचा उत्साहात कोठेही कमतरता नसल्याचे दिसून येत आहे.  शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

रविवारी  येत असलेल्या होळीची तयारी करताना बच्चे कंपनी गावागावात दिसत आहे. ग्रामीण भागात पाच  दिवस  होळीचा सण साजरा केला जातो. या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याची पारंपारिक ग्वाही देत आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने  होळी रचली जाते. या होळीची पारंपारिक पध्दतीने पुजा केली जाते. गावातील नवविवाहीत जोडपी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आजही कायम आहे. त्यानंतर होळी पेटविली जाते. होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी तरुणांची सर्वाचीच झुंबड उडत असते. काही तरुण, तरुणी  तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम व सामुहिक गरबानृत्य असे विविध नृत्य रात्रभर खेळले जातात.होळीच्या दुस—या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात. धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते. तर रंगपंचमीला गावाकडील  झाडा—फुलांपासुन तयार केलेले नैसर्गीक रंग वापरले जातात.वाडा, विक्रमगड, कुडूस या मोठय़ा बाजारपेठा तसेच विविध ठिकाणच्या आठवडा बाजारात सद्या गर्दी दिसून येत आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

ज्येष्ठांना मान

होळीच्या दिवशी  बांबुच्या खांब  होळी माता म्हणुन आणुन त्याची पुजा केली जाते. पुजेला तांदळाच्या, नाचणीच्या  पापडया, पुरणपोळी घरी बनवलेल्या वस्तुंचा नैवैद्य दाखविला जातो. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अथवा वयोवृद्ध नागरिकाला होळी पेटविण्याचा मान दिला जातो. ही प्रथा आजही ग्रामीण भागात आबाधीत आहे.

होळी निमित्ताने दरवर्षी संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. तसेच ज्या तरुणांना तंबाखू, गुटखा खाण्याचे व्यसन असते अशा तरुणांजवळील गुटखा, तंबाखूच्या पुडय़ा होळीत जाळून पुन्हा व्यसन करणार नाही अशी शपथ दिली जाते, यंदाही ही परंपरा कायम राहणार आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

-अजित ठाकरे, ग्रामस्थ, वावेघर