एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश

Patanjali Ads Case : योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफीची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असली तरी त्यांनी ॲलोपॅथी औधषांबाबत केलेल्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली.

Misleading Advertisements : योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच नाराजी व्यक्त केलेली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, तुम्ही चांगले काम करत असाल पण तुम्हाला ॲलोपॅथीला बदनाम करण्याचा अधिकार नाही. या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या बिनशर्त माफीचीही दखल खंडपीठाने घेतली.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

मागच्या आठवड्यात १० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.