एका भागाचा दोन प्रभागांत उल्लेख

फेब्रुवारीच्या प्रारंभी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखडय़ावर हरकती नोंदविण्यासाठी १४ तारखेपर्यंत मुदत आहे.

मोकळय़ा जागेवर वसाहतीचा उल्लेख, नकाशात दुसऱ्या प्रभागात नोंद; प्रारुप प्रभाग रचनेविषयी आतापर्यंत ६१ हरकती

नाशिक : प्रभाग क्रमांक २७ मधील मोकळय़ा जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर वसाहतीचा उल्लेख करून प्रभाग क्रमांक ३५ च्या प्रभाग रचना नकाशावर या वसाहत नावाची नोंद करण्यात आल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. एका भागाचे दोन प्रभागात विभाजन, काही प्रभागात परिसर आणि सीमारेषांबाबत स्पष्टता होत नाही, सीमांकन, नदी, नाले, हद्द चौक व रस्ते नियमा्प्रमाणे नाही. तसेच काही प्रभागांची व्याप्ती, याविषयी हरकती दाखल होत आहेत. वेगवेगळय़ा प्रभागांबाबत हरकती व सूचनांची संख्या ६१ वर पोहोचली आहे.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

फेब्रुवारीच्या प्रारंभी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखडय़ावर हरकती नोंदविण्यासाठी १४ तारखेपर्यंत मुदत आहे. अंतिम तारीख जवळ येत असताना हरकतींची संख्या वाढत आहे. जनार्दन जाधव यांनी रचनेत अण्णाभाऊ साठेनगर वसाहतीचा उल्लेख प्रभाग क्रमांक २७ मधील मोकळय़ा जागेत करून प्रभाग क्रमांक ३५ च्या प्रभाग रचना नकाशात या वसाहतीची नोंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रभाग क्रमांक १४ व ३३ च्या रचनेबाबत हरकती आल्या. सिन्नर फाटा परिसराचे दोन प्रभागात विभाजन करण्यात आले. प्रभाग २४ मध्ये विष्णूनगर, त्रिशरणनगर, गोदरेज वाडी परिसर आले असून ते वगळण्याची मागणी केली गेली आहे.

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

काही प्रभागांचा परिसर व सीमारेषांबाबत स्पष्टता होत नसल्याबाबत हरकती नोंदविल्या आहेत. काही प्रभागाचे सीमांकन, नदी, नाले, हद्द, चौक, प्रमुख रस्ते हे नियमाप्रमाणे नाही. काही प्रभागात व्याप्तीबाबत हरकत दाखल झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. यात प्रभाग क्रमांक २१, ४०, ११ ते १५, ३४, २९, ०४, १७, २४, ४२, २२, २७, ३५, ३६, ४० आदींचा समावेश आहे.

प्रभाग १४, नऊ आणि १७ मधील हरकती व सूचनांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या ६१ वर पोहोचली आहे. यात मनपा मुख्यालयात ३५, सातपूर विभागात १७ पंचवटीत चार, नाशिकरोड व नाशिकपूर्वमधून प्रत्येकी दोन, नवीन नाशिकमधील एकाचा समावेश आहे.

सुनावणीसाठी अश्विन मुदगल

हे वाचले का?  जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

प्रारूप प्रभाग रचनेविषयी प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने सिडकोचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक अश्विनकुमार मुदगल यांची नेमणूक केली आहे. २३ फेब्रुवारीला ते नाशिकला येऊन हरकतींवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जाते.