“एखादं राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र”, फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले

“कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही”

संपूर्ण कोव्हिडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती,” असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावरही निशाणा साधला. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“संपूर्ण कोव्हिडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्यांना जगभरातील देशांचं उदाहरण दिलं. त्यांनी काय केलं हेदेखील पाहिलं पाहिजे. त्यानंतर त्या देशांचं उदाहरण दिलं पाहिजे,” असा सल्ला फडणवीसांनी दिला.

हे वाचले का?  कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा; कोकण व गोवामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार

आव्हाडांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ““जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैशांचं पॅकेज तर दिलंच नाही पण त्याऐवजी लोकांचं वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं यावरच भर दिला आहे”.

“मुख्यमंत्र्यांनी रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती. नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? पुण्याला काय करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना बेड मिळत नाही, व्यवस्था नाही याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला,” अशी टीका फडणवीसांनी केली.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

“कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही. काय उपाययोजना करणार सांगितलं नाही. लॉकडाउन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागंत. पण तो अपवाद आहे, नियम नाही. लॉकडाउन करायचा असेल तर प्रत्येकाचा विचार करावा लागेल,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.