‘एमपीएससी’च्या परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाज्योती म्हणून ओळखल्या जाणारी ही संस्था राज्य शासनाने ओबीसी, भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्थापन केली आहे. या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून प्रशिक्षणाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. या आर्थिक वर्षांत केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी एक हजार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी दोन हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा देण्यात येणार आहे. यावर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत ते विद्यार्थीसुद्धा २०२२या वर्षांत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे. प्रशिक्षणासाठी विनामूल्य नोंदणी आवश्यक  कागदपत्रांसह ५ मार्चपर्यंत महाज्योतीच्या संकेतस्थळावर करता येईल. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पुस्तके, टॅब व इंटरनेट सुविधा मोफत मिळेल. करोनाचा कालखंड संपल्यानंतर राज्यातील नामांकित एमपीएससी व यूपीएससी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून ‘बार्टी’ प्रमाणे प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचे शुल्क व पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे विद्यावेतनसुद्धा देण्याचा निर्णय झाला आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

प्रशासकीय व सनदी अधिकारी होण्याचे शिक्षित युवकवर्गाचे स्वप्न असते. पण, या परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी लाखो रुपये शुल्क भरून शिकवणी वर्ग लावणे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. अशा सामान्य, पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

– प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती