एलपीजी जोडणीसाठी १,६५० कोटींची तरतूद; उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांत ७५ लाख जोडणीचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांमध्ये अतिरिक्त ७५ लाख मोफत एलपीजी जोडणी करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी १,६५० कोटी रुपयांची तरतूद केली.

पीटीआय, नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत तीन वर्षांमध्ये अतिरिक्त ७५ लाख मोफत एलपीजी जोडणी करण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी १,६५० कोटी रुपयांची तरतूद केली. २०२३ ते २०२६ या वर्षांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेनुसार लाभार्थीना पहिले सिलिंडर गॅसभरणा आणि शेगडी विनामूल्य प्रदान केली जाणार आहे, असे माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत ७५ लाख एलपीजी जोडणी करण्यासाठी या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली. या योजनेनुसार लाभार्थीना प्रतिवर्ष १२ गॅस पुनर्भरण करण्यासाठी १४.२ किलोच्या प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपये अनुदान दिले जाते. अतिरिक्त ७५ लाख जोडण्या केल्यास या योजनेच्या लाभार्थीची संख्या १०.३५ कोटींवर जाईल.