ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शेवटच्या क्षणी रद्द केला कार्यक्रम; विवेक अग्निहोत्री दाखल करणार खटला; म्हणाले “हिंदूफोबिक…”

“ते मला रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत”

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे चर्चेत आलेले बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने रद्द केला आहे. यानंतर नाराज झालेल्या विवेक अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत ही घटना ‘हिंदुफोबिक’ असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदू विद्यार्थी अल्पसंख्यांक असून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष पाकिस्तानी असल्याचं सांगितलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात भाषण देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पण शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत की, “मला ईमेलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सगळं काही ठरलं होतं. पण काही तासांपूर्वी मला चुकून दोन बुकिंग झाल्या असून यामुळे कार्यक्रम होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. मला न विचारता १ जुलै तारीख ठरवण्यात आली आहे. कारण त्या दिवशी कोणीही विद्यार्थी नसतील आणि कार्यक्रम करण्याला काही अर्थही नाही”.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

“ते मला रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीने निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत. आमच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा शिक्का मारला जात आहेत. ते नरसंहार रद्द करत आहेत आणि हिंदूंना रद्द करत आहेत. जणू काही हजारो काश्मिरी हिंदूंना मारणे हे हिंदुफोबिक नसून सत्यावर चित्रपट बनवणे म्हणजे इस्लामोफोबिक आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

केंब्रिज विद्यापीठातील कार्यक्रमही रद्द

व्हिडीओत ते सांगत आहेत की, “मी युरोपमध्ये असून माणुसकीच्या दौऱ्यावर आहे. केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटीश संसद, जर्मनी आणि नेदरलँडमधील अनेक प्रतिष्ठित ठिकाणांनी मला आमंत्रित केल्यामुळे हा दौरा ठरवण्यात आला. पण काल एक विचित्र घटना घडली. केंब्रिज विद्यापीठात पोहोचलो असता मला शेवटच्या क्षणी आम्ही कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही असं सांगण्यात आलं. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर १०० टक्के हल्ला आहे. काही पाकिस्तानी आणि काश्मिरी मुस्लिम विद्यार्थ्यांनी याला विरोध केल्यामुळे हे घडले. हे नरसंहार नाकारणारे आहेत. मी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भारत सरकारचं समर्थन करतो हा यामागील तर्क आहे”.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

“हे तेच विद्यापीठ आहे जिथे सुभाषचंद्र बोस यांनी शिक्षण घेतलं होतं, पण अलीकडेच त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बोस यांना फॅसिस्ट म्हटले गेले,” असं विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी या व्हिडीओत आपल्याला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. “मी यांच्याविरोधात खटला दाखल करत असून मला मदत करा. मी सर्व नुकसान भरपाई मागणार आहे. यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा