‘एससीईआरटी’च्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचे मत; विषाणूची भीती मंदावली
‘एससीईआरटी’च्या सर्वेक्षणात ८१.१२ टक्के पालकांचे मत; विषाणूची भीती मंदावली
पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात राज्यातील ८१.१२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे मत नोंदवले आहे. मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असलेल्या पालकांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिक तयारी पालकांनी के ल्याचे स्पष्ट होत आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच सुरू झाल्या. मात्र ऑनलाइन शिक्षणाची सुविधा सर्वच विद्यार्थ्यांना उपलब्ध नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू नसल्याचा विद्यार्थ्यांवर विविध प्रकारे दुष्परिणामही होत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वर्ग सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध के ल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालकांचा कल जाणून घेण्यासाठी के लेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष एससीईआरटीने मंगळवारी जाहीर के ले.
निष्कर्ष काय?
राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिला. सर्वेक्षणात प्रतिसाद नोंदवलेल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांपैकी ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील, ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आणि ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागात राहणारे आहेत. सर्वेक्षणात ८१.१८ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास होकार दिला आहे. तर १ लाख ३० हजार २ पालकांनी मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचे मत नोंदवले.
पालकांची काळजी शिक्षणाबाबत
सर्वेक्षणामध्ये प्रतिसाद दिलेल्या पालकांपैकी २.८९ टक्के पालकांची मुले पूर्वप्राथमिकच्या वर्गातील, २३.४८ टक्के पालकांची मुले पहिली ते पाचवीतील, ३१.२१ टक्के पालकांची मुले सहावी ते आठवीच्या वर्गातील, ४१.५४ टक्के पालकांची मुले नववी आणि दहावीच्या वर्गातील, तर १५.२६ टक्के पालकांची मुले अकरावी आणि बारावीत आहेत.
पुणे सर्वात पुढे..
या सर्वेक्षणाला सर्वाधिक प्रतिसाद पुणे जिल्ह्य़ातील पालकांनी दिला. पुणे जिल्ह्य़ातील ७३ हजार ८३८ पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्या खालोखाल मुंबई महापालिका क्षेत्रातील ७० हजार ८४२, नगर जिल्ह्य़ातील ३४ हजार ६७, कोल्हापूर जिल्ह्य़ातील ३० हजार ४३७, नाशिक जिल्ह्य़ातील ४७ हजार २०२, सातारा जिल्ह्य़ातील ४१ हजार २३३, ठाणे जिल्ह्य़ातील ३९ हजार २२१ पालक आहेत.
आता निर्णय काय? राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. आता सर्वेक्षणातून पालकांचा कल समोर आल्यानंतर अन्य वर्ग सुरू करण्यास राज्य शासन मान्यता देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.