औषध बाजार गजबजला ; उलाढालीत लक्षणीय वाढ

बाजारातील दैनंदिन उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

नाशिक : कठोर निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद असल्याने बाजारपेठेतील गर्दी ओसरली असली तरी दुसरीकडे बाधितांच्या वाढत्या संख्येने गोळे कॉलनीतील औषध बाजार गजबजल्याचे चित्र आहे. कोणी रेमडेसिविरची विचारणा करते तर कोणी प्रतिजन चाचणी संच मिळेल काय, याची चाचपणी करतात. करोनाशी संबंधित औषधांसह स्वच्छतेशी संबंधित साधनांची लक्षणीय खरेदी-विक्री होत आहे. रेमडेसिविरसारख्या काही औषधांचा तुटवडा भासत आहे. औषधांसह रुग्णालयांना लागणाऱ्या साहित्याचा याच भागातून पुरवठा होता. औषध विक्रेत्यांसोबत दुकानांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. बाजारातील दैनंदिन उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक स्तंभ रस्त्यालगतचा गोळे कॉलनी परिसर प्रदीर्घ काळापासून औषध विक्रीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जातो. विविध कंपन्यांच्या औषधांचे जवळपास १५० घाऊक विक्रेते या परिसरात आहेत. शहर, ग्रामीण भागातील विक्रेते, रुग्णालये यांना लागणारी औषधे, वैद्यकीय साधने या बाजारात उपलब्ध असतात. शहरात दोन हजार तर ग्रामीण भागात तीन हजार असे सुमारे पाच हजार विक्रेते जिल्ह्यात आहेत. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या आजाराशी संबंधित औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्याचे प्रत्यंतर बाजारात फेरफटका मारल्यावर येते.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

एरवी औषध विक्रेत्यांपुरता मर्यादित राहिलेल्या बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. सकाळी नऊ वाजता उघडलेल्या काही दुकानांसमोर रात्री उशिरापर्यंत ही स्थिती असते. करोनाशी संबंधित नियमांचे पालन व्हावे म्हणून दुकानदारांनी खबरदारी घेतली आहे. दुकानाच्या काऊंटरलगत कोणी येऊ नये म्हणून दोरी बांधून सुरक्षित अंतराचे पथ्य पालन केलेले आहे. ग्राहक रांगेत उभे राहतील, याची चिन्हांकनाने व्यवस्था करण्यात आली. अनेक दुकानांबाहेर स्वच्छतेसाठी लागणारे सॅनिटायझर, सोडियम हायपोक्लोराईडच्या प्लास्टिकच्या डब्यांची भलीमोठी रांग दिसते. परिसरात काही किरकोळ औषध विक्रीची दुकाने आहेत. तिथे रेमडेसिविर मिळवण्यासाठी जिल्ह्यातील नव्हे तर, आसपासच्या जिल्ह्यातून रुग्णांचे नातेवाईक येत आहेत. सध्या अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे स्वस्त मिळतील, या अपेक्षेने नागरिक या ठिकाणी येतात. करोनाशी संबंधित औषधांसह वाफ घेण्याचे यंत्र, स्वच्छतेची साधने, मुखपट्टी, हातमोजे आदींची मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. मध्यंतरी एका युवकाने तर घाऊक विक्रेत्याकडे प्रतिजन चाचणी संच मिळेल का, अशी विचारणा केली होती. हे संच दुकानात विक्रीस नाही हे संबंधिताला विक्रेत्यास सांगावे लागले.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

बाधितांच्या नातेवाईकांचे भटकणे घातक

रेमडिसिव्हरसह अन्य औषधांसाठी बाधिताचे नातेवाईक, कुटुंबियांचे भटकणे घातक आहे. मुळात रुग्णांना रेमडिसिव्हर उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालयांची आहे. परंतु, रुग्णालयांकडून चिठ्ठी दिली जाते. बाधिताचा नातेवाईक चार दुकानांमध्ये तपास करत फिरतो. ही बाब करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारक ठरू शकते, याकडे औषध विक्रेता संघटनेने लक्ष वेधले.

सात वाजेनंतर गोळे कॉलनीतील बरेचसे विक्रेते आपली दुकाने बंद करतात. दोन, तीन विक्रेत्यांकडे रेमडिसिव्हर असतात. त्यांच्याकडे गर्दी असू शकते. करोनाशी संबंधित औषधे सोडली तर उर्वरित बाजारात शांतता आहे. ‘इंजेक्टेबल’ अर्थात सिप्रोझिम, हेपारिन अशा काही औषधांची काहीअंशी कमतरता भासते. पण अनेक कंपन्या त्या बनवत असल्याने अडचण येत नाही. अन्न औषध प्रशासनाने रेमडिसिव्हरचा जो साठा आहे, तो केवळ करोना रुग्णालयाला दिला जाईल, असे परिपत्रक काढले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात प्रमाणपत्र तयार केले आहे. त्याआधारे रेमडिसिव्हरचे वितरण सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासन आणि औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

– राजेंद्र धामणे (अध्यक्ष, नाशिक औषध विक्रेता संघटना)