कडक निर्बंध लावण्यात आलेल्या महाराष्ट्रात येणार केंद्रीय पथक; पंतप्रधान कार्यालयाची माहिती

मोदींच्या नेतृत्वातील बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाची माहिती

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि मृतांच्या संख्येतही वाढ पहायला मिळत असल्याने केंद्रीय पथक महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी पंतप्रधान कार्यालयाकडून राज्यांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय पथकं महाराष्ट्रासोबतच पंजाब आणि छत्तीसगडचाही दौरा करणार आहेत. या पथकांमध्ये आरोग्य तज्ञ तसंच डॉक्टरांचा समावेश असेल.

पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात मास्क तसंच सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन न केल्यानेच रुग्णसंख्येत इतकी मोठी वाढ होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करोना साथीच्या काळात पाळावयाच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताणतणाव या तीन कारणांमुळे अलीकडच्या काळात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सांगितलं.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

६ ते १४ एप्रिलदरम्यान मुखपट्टीचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. तसंच आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता, वेगाने चाचण्या व लसीकरण, खाटांची संख्या वाढवणे या उपायांचाही अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सामूहिक जबाबदारीचे पालन करोनाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट

केंद्राने राज्यांना यापूर्वीच गर्दी टाळण्यापासून इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या असून त्यात मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतर हे उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यातील ढिलाईमुळे रुग्णवाढ झाल्याचे सांगण्यात आले. विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी याआधी असं म्हटलं होतं, की. “विषाणूच्या उत्परिवर्तनाचा रुग्णवाढीशी कमी संबंध आहे. आता त्यांनी असे म्हटले आहे, की प्रतिबंधित क्षेत्रे वाढवणे, काही भागांत टाळेबंदी, करोना चाचण्या करणे व संसर्ग असलेल्यांनी विलगीकरणात राहाणं महत्त्वाचं आहे”.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

विषाणूची जनुकीय क्रमवारी वाढवण्याची गरज असून माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. विशिष्ट भागात करोनाची वाढ जास्त का आहे हे माहितीची तुलना करून ठरवता येईल असं त्यांनी सांगितलं.