आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक कामे मार्गी लावण्याची धडपड सुरू आहे.
नाशिक: पुढील काही दिवसात महापालिकेच्या स्थायी समितीची मुदत संपुष्टात येत असल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांची एकच लगीनघाई सुरू झाली असून विविध विषय मार्गी लावण्याची धडपड सुरू आहे. करोना काळजी केंद्रात रुग्णांना पुरविण्यात आलेल्या भोजनापोटी सुमारे ५२ लाख रुपये देण्याबाबत दोन स्वतंत्र विषय मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात आले आहेत. याशिवाय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील खाटांना प्राणवायू नलिका जोडणीसाठी सव्वा आठ लाख रुपये खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्याचाही विषय आहे.
आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक कामे मार्गी लावण्याची धडपड सुरू आहे. यात मागील प्रलंबित विषयांचा निपटारा करण्याचा सदस्यांचा प्रश्न आहे. मंगळवारी साडेअकरा वाजता स्थायी समितीच्या आभासी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. करोना काळात मनपा रुग्णालये व काळजी केंद्रात रुग्णांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या बाबत प्रशिक एजन्सीला काळजी केंद्रात भोजन पुरवल्यापोटी ४५ लाख ९० हजार ९५१ रुपये आणि मेरी करोना काळजी केंद्रात पुरविलेल्या भोजनापोटी पाच लाख ९८ हजार ६६० रुपये अदा करण्याचे प्रस्ताव प्रशासनाने ठेवले आहेत.
या शिवाय डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू टाकीतून खाटांना नलिका जोडणीचे काम करण्यात आले. त्यापोटी आठ लाख ३३ हजार रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजूरी देण्याचा विषयही मांडण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पंचवटीतील प्रभाग पाचमधील मधुबन कॉलनीतील उद्यानाच्या नुतनीकरणासाठी २५ लाख ३३ हजार, प्रभाग २३ मध्ये वाहिनी टाकण्यासाठी ३० लाख ६५ हजार, गोदावरी नदीच्या उजव्या तिरावरील मुख्य मल वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी दोन लाख रुपये खर्चास मंजुरी देण्याचा विषयही प्रशासनाने ठेवला आहे.