करोना तपासणी अहवालासाठी पालिका रुग्णालयात खेटे मारण्याची वेळ

नमुने देणाऱ्या व्यक्तींना आपण बाधित आहोत की नाही हे माहिती नाही.

नाशिक : शहरात करोनाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. गुरुवारी, शुक्रवारी नमुने देणाऱ्यांना सोमवारीही अहवाल मिळाले नाहीत. त्यासाठी संबंधितांना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात खेटा माराव्या लागत आहेत. अहवालास होणारा विलंब करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरणारा आहे.

काही दिवसांत करोनाबाधितांची संख्या कमालीची वाढली आहे. बाधितांच्या संपर्कात येणारे तसेच काही लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची महापालिकेमार्फत चाचणी केली जाते. मागील आठवडय़ात गुरुवारी, शुक्रवारी पालिकेच्या रुग्णालयात नमुने देणाऱ्यांना अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. सोमवारी सकाळी अशा २० ते २५ व्यक्तींनी अहवालासाठी इंदिरा गांधी रुग्णालय गाठले. परंतु, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची तक्रार होत आहे.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

शुक्रवारी नमुने दिल्यानंतर एक व्यक्ती शनिवारी अहवाल घेण्याकरिता गेली होती. त्याला रविवारच्या सुट्टीमुळे सोमवारी येण्यास सांगितले. सोमवारी सकाळी गेल्यावर दुपारी दोन वाजता येण्यास सांगितले. त्यानुसार ती व्यक्ती गेल्यानंतर संबंधित कक्ष बंद झालेला होता. सकाळी अहवाल घेण्यासाठी बरेच लोक रुग्णालयाबाहेर जमले होते. त्यातील काहींनी गुरुवारी नमुने दिले होते. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. संबंधितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलाविण्याची मागणी केली. परंतु, त्याला रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळाला नाही. अहवाल व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्याची विनंती केली. परंतु, अहवाल घेण्यासाठी प्रत्यक्ष यावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

नमुने देणाऱ्या व्यक्तींना आपण बाधित आहोत की नाही हे माहिती नाही. अहवालासाठी ते घरून पालिका रुग्णालयात चकरा मारत आहेत. सार्वजनिक ठिकाणी, घरात अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यातील कोणी बाधित झाल्यास अहवालातील विलंब करोनाचा संसर्ग वाढविण्याचे कारण ठरू शकतो. जलद अहवाल मिळण्यासाठी महापालिकेने स्वत:ची प्रयोगशाळा उभारली असली

तरी ती कार्यान्वित झाली नसल्याने खासगी प्रयोगशाळेकडून तपासणी करवून घेतली जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता विस्तारण्यात आली आहे. या स्थितीत अहवालास विलंब होत असल्याने या संदर्भात आरोग्य-वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नमूद केले.

हे वाचले का?  नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद