२०२२ च्या अखेरीस देशात ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य होईल या स्थितीत आहोत असेही सांगण्यात आले आहे
देशात करोनाची रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी होत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांच्या वक्तव्याने पुन्हा चिंता वाढवली आहे. भारतात सध्या करोनाचा स्थानिक स्तरावर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे कमी किंवा मध्यम पातळीच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे, असे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. स्थानिक पातळीवरील संसर्ग म्हणजे जेव्हा एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक प्रमाणातील नागरिक विषाणूसह जगायला शिकतात असा टप्पा. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडत आहे.
कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आल्यानंतरच्या टप्प्याबद्दल बोलताना स्वामीनाथन यांनी, मला पूर्ण विश्वास आहे की जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक गट कोव्हॅक्सिनला त्याच्या अधिकृत लसींपैकी म्हणून एक मंजूर करण्यास तयार असेल आणि हा निर्णय सप्टेंबरच्या मध्यापर्यंत होऊ शकतो. ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत स्वामीनाथन म्हणाल्या की, “आपण बहुधा स्थानिक पातळीच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत, जिथे कमी किंवा मध्यम पातळीचा प्रसार आहे. आम्हाला आता काही महिन्यांपूर्वी दिसलेली रुग्णसंख्येतील प्रचंड वाढ आणि तशी एकंरदरित परिस्थिती सध्या दिसत नाहीय. भारताचे आकारमान आणि लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, ही परिस्थिती खूपच व्यवहार्य आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहू शकते. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळू शकतो.”
२०२०च्या अखेरीस ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करु: स्वामीनाथन
स्वामीनाथन यांनी आशा व्यक्त केली की २०२२ च्या अखेरीस पर्यंत भारत ७० टक्के लसीकरणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या स्थितीत आहे. हे लसीकरण झाल्यानंतर देशात परिस्थिती सामान्य होईल, असंही त्या म्हणाल्यात. मुलांमध्ये करोनाच्या प्रसारावर स्वामीनाथन म्हणाल्या की, “पालकांनी घाबरण्याची गरज नाही. आम्ही सेरो सर्वेक्षण पाहतोय़ आणि इतर देशांकडून जे शिकलो त्यातून दिसते की मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असली तरी बहुतेक मुलांना सुदैवाने अतिशय सौम्य प्रकारचा संसर्ग होतो.”
उपचारासाठी रेमडेसिविर, एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिन सारख्या औषधांचा वापर करण्यावर त्या म्हणाल्या की, “आजपर्यंत असे कोणतेही पुरावे नाहीत की एचसीक्यू किंवा इव्हरमेक्टिनच्या वापरामुळे संक्रमित लोकांचा मृत्यू किंवा रुग्णसंख्या कमी करण्यात किंवा प्रत्यक्षात लोकांना संसर्ग होण्यापासून रोखण्यात यश आलं आहे. म्हणून उपचार किंवा प्रतिबंधासाठी यापैकी कोणत्याही औषधांचा वापर करण्याची शिफारस करता येतील अशी कोणतीही कारणे सध्या उपलब्ध नाहीत.”