कर्ज काढतोय म्हणजे पाप करत नाही, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा

आपल्या बजेटमध्ये ७० ते ८० हजार कोटी कर्जातून येतात.

“काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारपेक्षा विद्यमान केंद्र सरकार शेतकऱ्यांना जास्त मदत करेल” अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागच्या आठवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेत आहेत. “राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला व या आपत्तीत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगितलं. यूपीएपेक्षा विद्यमान केंद्र सरकार शेतकऱ्याला जास्त मदत करेल” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

“आपल्या बजेटमध्ये ७० ते ८० हजार कोटी कर्जातून येतात. नंतर त्याची आपण परतफेड करतो. कर्ज काढतोय म्हणजे काही पाप करत नाहीय. यावर्षी आरबीआयने जी मर्यादा ठरवलीय, त्यानुसार एक लाख २० हजार कोटीपर्यंत कर्ज काढता येईल. आतापर्यंत फक्त ६० हजार कोटींच कर्ज काढलय” असे फडणवीस म्हणाले. काल शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी, कर्ज काढणं म्हणजे पाप नाही असं म्हटलं आहे.

“राज्य कर्जबाजारी झालेय, ओव्हरड्राफ्ट घ्यावा लागेल किंवा आरबीआयच्या मर्यादेबाहेर जाऊन कर्ज घेतोय, अशी स्थिती नाही. त्यामुळे कर्ज काढणे शक्य आहे” असे फडणवीस म्हणाले. जीएसटीच्या मुद्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “केंद्राने राज्याला जीएसटीचा परतावा दिला आहे. राज्यांनी सांगितलं, केंद्राने कर्ज काढावं. त्यानुसार राज्यांना जीएसटीच्या परताव्याची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकार एक लाख कोटीचे कर्ज काढणार आहे”

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

“राज्य सरकारने पदरचा पैसा खर्च केला तरी तो पैसा परत येईल. महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये मतभेद आहेत, पण केंद्राने मदत करावी, यावर त्यांच एकमत असतं. महाराष्ट्र सक्षम आणि समृद्ध राज्य आहे. त्यांना २२ हजार कोटी रुपये उभं करणं कठिण नाही. शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कारण सांगण योग्य नाही” अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”