कर्मचारी संपामुळे ‘आदिवासी विकास’चे कामकाज थंडावले

शासन निर्णयामुळे आदिवासी विकास विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक या कर्मचाऱ्यांची पदोन्नती कायमस्वरूपी कुंठीत होईल.

नाशिक : आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय स्थगित करावा, या मागणीसाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सर्व कर्मचारी लाक्षणिक संपावर गेल्यामुळे या विभागाचे बहुतांश काम थंडावले. शासन निर्णयामुळे आदिवासी विकास विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी, कनिष्ठ-वरिष्ठ लिपिक या कर्मचाऱ्यांची पदोन्नती कायमस्वरूपी कुंठीत होईल. या संदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेने दिला आहे. निदर्शने करताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतराचे पथ्य गुंडाळून ठेवत घोषणाबाजी केली.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील सर्व प्रकल्प अधिकारी कार्यालय, जात पडताळणी, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास आयुक्तालयातील कर्मचारी या एकदिवसीय लाक्षणिक संपात सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला. वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांनी आदिवासी विकास विभागात १५८ नवी पदे निर्माण करून शासनाच्या तिजोरीवर बोजा टाकला. आदिवासी विकास विभागातील ९६ उपलेखापालांची पदे लेखा विभागासाठी वापरण्यात येणार आहेत. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय यंत्रणेला विश्वासात न घेता शासनाची दिशाभूल करणारी माहिती सादर करून चुकीचे ठराव जनजाती सल्लागार परिषदेत केल्याचा आरोप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केला. शासनाने २३ ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी स्थगित करावी, उपलेखापालपदाची पदे आदिवासी विकास विभागाकडे ठेवण्यात यावी, आदिवासी विकास विभागातील सर्व उपलेखापालांचे नामकरण मुख्य लिपीक अथवा प्रमुख लिपिक असे करावे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन पाठविला नाही. ही गंभीर बाब असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करणारी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

विकास योजनांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाचा भार आहे. याचा विचार शासन निर्णयाआधी झाला नाही. उपरोक्त निर्णयामुळे शासनावर अनावश्यक आर्थिक बोजा पडणार आहे.