कांदा भावात चढ-उतार कायम

दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी पातळीवरून नेहमीप्रमाणे धडपड सुरू आहे.

लासलगाव समितीत वाढ तर, मनमाडला भावात घसरण

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यातील उपाहारगृहे सुरू झाल्यामुळे कांद्याच्या मागणीत कमालीची वाढ होऊन तीन दिवसांपूर्वी क्विंटलला सात हजारांचा टप्पा ओलांडून नंतर सहा हजार रुपयांच्या खाली गडगडलेल्या कांदा दरात गुरुवारी पुन्हा काहीशी वाढ झाली. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सहा हजार २०० रुपये भाव मिळाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत दरात ४०० रुपयांनी वाढ झाली. मनमाड बाजार समितीत मात्र क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली. चार दिवसांच्या तुलनेत कांद्याला कमी भाव मिळाला. देशांतर्गत कांद्याचे वाढणारे भाव नियंत्रणात आणण्यासाठी तो आयात करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. हंगामात प्रथमच कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने उत्पादकांचा आयातीला विरोध आहे.

आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांत पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नवीन कांदा फारसा बाजारात येण्याची शक्यता धुसर झाली. दुसरीकडे महाराष्ट्रात चाळीत साठविलेला कांदा पावसाळी वातावरणामुळे खराब होत आहे. त्याची आवक बरीच घटली आहे. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादली. नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या कांद्याला परवानगी दिली. या घटनाक्रमात महिनाभरापासून कांदा दरात वाढ होत असताना राज्यात उपाहारगृहे उघडल्यानंतर मागणी प्रचंड वाढली. तीन दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ७१०० रुपये भाव मिळाला. कमाल १९०१ ते कमाल ७८१२ रुपये दरात कांद्याचे व्यवहार झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दर क्विंटलला १३०० रुपयांनी घसरले. यामागे परदेशातून येऊ घातलेला कांदा हे एक कारण असल्याचे सांगितले जाते. यामुळे गुरुवारी घसरण होते की दर उंचावतात याकडे सर्वाचे लक्ष होते. या दिवशी लासलगाव बाजार समितीत पहिल्या सत्रात सुमारे साडेतीन हजार कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी ६२०० रुपये दर मिळाला. आदल्या दिवशीच्या तुलनेत दरात ४०० रुपयांनी वाढ झाली. परदेशातील कांदा तुलनेत स्वस्त असला तरी त्याला चव नसते. आजवर अनेकदा हे प्रयोग झाले आहेत.आयात केलेल्या कांदा आणि भारतीय कांदा यांची तुलना करता येत नाही. उपाहारगृहांची काही अंशी गरज त्यातून भागून जाईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी पातळीवरून नेहमीप्रमाणे धडपड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाने जिल्ह्यतील १२ मोठय़ा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांचे व्यवहार, कांदा साठा आणि विक्री याची पडताळणी केली. या कारवाईत कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीतील आठ व्यापाऱ्यांचा समावेश होता.

वारंवार होणाऱ्या कारवाईमुळे जाच होत असल्याची भावना व्यक्त करत व्यापाऱ्यांनी तीन दिवस लिलावात सहभागी न होणे पसंत केले होते. परतीच्या पावसामुळे खरिपाचे पीक लांबले. अनेक ठिकाणी रोपांचे नुकसान झाले. वातावरणात चाळीतील उन्हाळ कांदा खराब होत आहे. मागणी आणि पुरवठय़ात मोठे अंतर पडल्याने पुढील महिनाभर या स्थितीत बदल होणार नसल्याचे सांगितले जाते. राज्यातील नवीन कांदा डिसेंबरमध्ये येईल. तत्पूर्वी गुजरात, राजस्थानमधून नवा कांदा आल्यास दर काहीसे कमी होतील. अन्यथा तोपर्यंत कांदा दरात चढ-उताराची शृंखला कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

सरासरी ५,८०० ते ६,५०० क्विंटल

तीन दिवसांपूर्वी सरासरी सात ते साडेसात हजारांचा टप्पा गाठणारे कांद्याचे भाव बुधवारी गडगडल्यानंतर गुरुवारी त्यात पुन्हा काहीशी सुधारणा झाली. गुरुवारी लासलगाव बाजार समितीत क्विंटलला ६२०० रुपये, सटाणा बाजार समिती ६,३५०, उमराणे ६,३५०, चांदवड ५,८५०, येवला ५,९००, कळवण ६,५००,देवळा ५,८५०, नामपूर ६,२०० रुपये दर मिळाले. अतिवृष्टी, उकाडा, परतीचा पाऊस त्यामुळे कांदा खराब व्हायला लागला. आता तर पावसामुळे कांद्याचे पीकही पाण्याखाली गेले. त्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे.