कांदा लिलाव पूर्ववत; निर्यात बंदीनंतर दीड हजाराची घसरण

याच दिवशी शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे होणाऱ्या आंदोलनात अनेक भागातील शेतकरी सहभागी झाले.

नाशिक: कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. पण, उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. याच दिवशी शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे होणाऱ्या आंदोलनात अनेक भागातील शेतकरी सहभागी झाले. त्यामुळे या दिवशी बाजार समित्यांमध्ये आवकही तुलनेत बरीच कमी झाली.

कुठलीही मुदत न देता अकस्मात निर्यातीवर बंदी घातल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेने लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी बदलला. व्यवहार सुरळीत झाल्यानंतर लिलाव पूर्ववत करणार असल्याचे संघटनेने म्हटले होते. त्यानुसार लासलगाव, पिंपळगाव व मनमाडसह काही ठिकाणी लिलावाला सुरुवात झाली. गुरुवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी ३३६० तर उन्हाळ कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले होते. सोमवारी तेच दर लाल कांद्याचे २२६० तर, उन्हाळ कांद्याचे २४६० पर्यंत खाली आले. या दिवशी ५७२२ क्विंटलची आवक झाली. मुंबई बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी निर्यात बंदीच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये शुक्रवारच्या तुलनेत कांद्याचे दर जवळपास १२०० ते १५०० रुपयांची कमी झाल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  पुरवठा विभागाचे कार्यालय अपंगांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर

मनमाड बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी २५८० रुपये तर लाल कांद्याला सरासरी २२५० रुपये दर मिळाले. गुरूवारी उन्हाळ व लाल कांदा सरासरी ३४०० रुपये प्रति क्विंटल असे दर होते. सोमवारी आवकही घटली आणि कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोमवारी लिलाव सुरू झाल्यानंतर दरात एक हजार ते १२०० रुपयांची घसरण झाल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांनी शेतकर्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

हे वाचले का?  नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा

सोमवारी जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव या प्रमुख बाजारांमध्ये लिलाव सुरू झाले आहेत. मंगळवारी अमावास्येनिमित्त बहुतांश बाजार बंद असतात. त्यामुळे बुधवारपासून सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होतील. – खंडू बोडके (अध्यक्ष, नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटना)