कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा; पंतप्रधान मोदींचा स्वामी अवधेशानंद गिरी यांना फोन

स्वामी अवधेशानंद यांनी ट्विट करून जनतेला केलं आवाहन

देशात करोनाचं संकट गंभीर झालेलं असतानाच्या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही करोनाचा शिरकाव झाला असून, येणाऱ्या काळात कुंभमेळ्यामुळे देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात करोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचले का?  अंतराळातील कचऱ्याबद्दल राष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. “आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि करोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल,” असं आवाहन मोदींनी केलं आहे.

हे वाचले का?  भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार

पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही ट्विट केलं आहे. “पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. जीवनाची रक्षा करणं मोठं पुण्य आहे. माझा जनतेला आग्रह आहे की, करोना परिस्थिती बघता मोठ्या संख्येनं स्नान करण्यासाठी येऊ नये. त्याचबरोबर नियमांचं पालन करावं,” असं स्वामी अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.

हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात अनेक साधू आणि भाविकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. तर दुसरीकडे अनेक आखाड्यांनी कुंभमेळ्यातून परतीची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यात झालेल्या करोनाच्या शिरकावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!