भूतदयेच्या नावाखाली कोणताही शास्त्रीय अभ्यास न करता नाशिकसह इतर शहरांमध्ये सिमेंटचे पक्षी मनोरे उभारण्यात येत असून हे मनोरे पर्यावरणासाठी घातक असल्याचे उघड झाले आहे.
कबुतर, पारव्यांनाच फायदा; बंदी घालण्याची पक्षिमित्रांची मागणी
नाशिक : भूतदयेच्या नावाखाली कोणताही शास्त्रीय अभ्यास न करता नाशिकसह इतर शहरांमध्ये सिमेंटचे पक्षी मनोरे उभारण्यात येत असून हे मनोरे पर्यावरणासाठी घातक असल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेशात अशा कृत्रिम मनोऱ्यांवर बंदी आणण्यात आली असून महाराष्ट्रातदेखील अशी बंदी सरकारने आणायला हवी, अशी मागणी पक्षिमित्रांकडून करण्यात येऊ लागली आहे.अनेकांना पक्ष्यांसाठी काहीतरी करावे, असे वाटते. या भावनेतून पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कसा असतो, त्यांची घरटी कशी असतात, त्यांना कोणते वातावरण मानवले जाते, याविषयी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता दिसायला छान आणि भव्य असे सिमेंटच्या पक्षी मनोऱ्यासारखे काहीतरी केले जाते. परंतु, अशा प्रकारच्या कृत्रिम मनोऱ्यांचा पक्षांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नसल्याचे आता निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. मध्य प्रदेश सरकारने या विषयावर नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने असे मनोरे नको, असा अहवाल दिला आहे. असे सिमेंटचे कृत्रिम पक्षी मनोरे फक्त पारवे, कबुतरांसाठी फायदेशीर असून इतर पक्षी त्या ठिकाणी येत नाहीत. पक्षी हे झाडे, गवत, पाणथळ जागा आणि झुडपांमध्ये नैसर्गिक घरटी बनवत असतात. पूर्वीच्या काळी कबुतरे ज्या ठिकाणी रहात असे त्याला ‘पारावत’ म्हंटले जात असे. डोंगर, कडे, कपारीमध्ये हे कबुतरांचे नैसर्गिक अधिवास होते. परंतु, सिमेंटच्या जंगलात त्यांना मोठय़ा इमारती डोंगरासारख्या वाटू लागल्याने त्यांनी शहरात रहाणे पसंद केले.
आज प्रत्येक शहरात कबुतरांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आता शहराजवळील विमानतळांसाठी देखील ते घातक बनले आहेत. कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे मानवाला अनेक आजारांचा धोका निर्माण झाला आहे. फुफ्फुसाचे आजार अधिक प्रमाणात होऊ लागले आहेत. मुंबईतही कबुतरांची संख्या अधिक असून ती कमी कशी करायची, यावर आता विचार केला जात आहे. नाशिक शहरातही कबुतरांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मोठय़ा शहरात सिमेंटची जंगले उभी राहत असताना तितक्याच झपाटय़ाने कबुतरे,आणि पारव्यांची संख्या वाढत असून कावळे, चिमण्या दिसेनासे झाले आहेत. शहरात जखमी होणाऱ्या पक्ष्यांमध्ये कबुतरांचीच संख्या जास्त असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळेच सिंमेटच्या कृत्रिम मनोऱ्यांचा लाभ कबुतरांनाच अधिक होणार असल्याने असे सिमेंटचे कृत्रिम मनोरे उभारण्यावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
कबुतरांचा नैसर्गिक अधिवास हा डोंगर, कपारी हा आहे. त्यांना आपण शहरात राहणे भाग पाडत असून मध्य प्रदेशात अशा सिमेंटच्या कृत्रिम मनोऱ्यांवर सरकारने बंदी आणली आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली असे मनोरे महानगरपालिकेने बांधू नये. अशा मनोऱ्यात कबुतरवगळता इतर कोणतेच पक्षी राहणार नाही. भूतदयेच्या नावाखाली असे मनोरे विशिष्ट जातीचे पक्षी वाढविण्यासाठी बनविले की काय अशी शंका निर्माण होते.
– प्रा. आनंद बोरा (अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक)