कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? ‘या’ औषधाच्या सेवनाने एकाच वेळेस १८ जण कॅन्सरमुक्त; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

“असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे,” असं न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. यांनी सांगितलं.

Cancer Treatment: रेक्टल कॅन्सर असलेल्या अमेरिकेमधील काही रुग्णांनी नुकताच एक चमत्कार वाटावा असा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय. त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांचा कर्करोग प्रायोगिक उपचारांनी नाहीसा झाला. ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या म्हणण्यानुसार, एका अत्यंत लहान क्लिनिकल चाचणीत, १८ रुग्णांनी डॉस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध सुमारे सहा महिने सातत्याने घेतले. याचा परिणाम असा झाल की या सहा महिन्यांनंतर त्या सर्वांच्या शरीरामधील कॅन्सचा ट्यूमर गायब झाल्याचे दिसून आले. या संशोधनासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर हे औषध खरोखरच कॅन्सरवरील रामबाण उपाय ठरु शकतं का यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र त्यासाठी मोठ्याप्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय.

इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार
डॉस्टारलिमॅब हे औषध प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या रेणूंपासून बनवण्यात आले आहे. हे औषध मानवी शरीरात पर्यायी प्रतिपिंडांप्रमाणे काम करते. संबंधित प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या सर्व १८ रुग्णांना गुदाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते. या सर्व रूग्णांना समान प्रमाणामध्ये हे औषध देण्यात आले. उपचारांच्या परिणाम असा झाला की या सर्वच्या सर्व १८ रूग्णांचा कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला. शारीरिक तपासणीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये सध्या कॅन्सरचा कुठलाही ट्यूमर सापडलेला नाही. एंडोस्कोपी; पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनच्या माध्यमातून चाचण्या करण्यात आल्यानंतरही त्यांच्या शरीरामध्ये कॅन्सरचा ट्यूमर आढळून आला नाही. न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे. यांनी, “असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे,” असं सांगितलं.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

देण्यात आलेला इशारा तरी…
‘न्यूयॉर्क टाईम्स’नुसार, क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या रूग्णांवर ही चाचणी सुरु होण्याआधी केलेल्या कॅन्सरच्या उपचारांदरम्यान केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रीयांसारख्या उपचाराच करुन बघितले होते. मात्र या चाचणीमध्ये सहभागी झाल्यानंतर जशाजशाप्रकारे उपचार पुढील टप्प्यामध्ये जातील त्याप्रमाणे रुग्णांना आतडी, मूत्रपिंड आणि लैंगिकतेसंदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात असा इशारा देण्यात आलेला. मात्र हा धोका पत्कारुन हे १८ रुग्ण या चाचणीला सामोरे गेले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच टप्प्यात हे रुग्ण कर्करोगमुक्त झाले आणि त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता लागली नाही.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

जागतिक स्तरावर कौतुक व्हायला हवं
या १८ रुग्णांवरील उपचार आणि त्यामधून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे आता वैद्यकीय जगतात खळबळ उडाली आहे. मीडिया आउटलेटशी बोलताना, कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अ‍ॅलन पी. वेनूक म्हणाले की, “प्रत्येक रुग्ण अशाप्रकारे कॅन्सरमुक्त झाल्याचं यापूर्वी ‘कधीही ऐकिवात’ नाही.” या संशोधनाचे वेनूक यांनी जागतिक स्तरावर कौतुक व्हायला हवं असं म्हटलं. या चाचणीत औषधामुळे सर्वच रुग्ण बरे होण्याबरोबरच त्यांच्या शरीरामध्ये लक्षणीय गुंतागुंत झाली नाही, हे सर्वात विशेष असल्याचं डॉ. वेनूक यांनी सांगितलं.

अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते
मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर आणि पेपरच्या सह-लेखिका, ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आंद्रिया सेरसेक यांनी रुग्ण कर्करोगमुक्त असल्याचे आढळले त्या क्षणाचे वर्णन केले आहे. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, “अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.”

कॅन्सर इतर भागांमध्ये पसरला नाही
“चाचणीसाठी, रुग्णांनी सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी डॉस्टारलिमॅब घेतले. ते सर्व त्यांच्या कर्करोगाच्या समान अवस्थेत होते. त्यांना झालेला कर्करोग हा एका ठराविक भागापुरता मर्यादित होता, मात्र तो इतर अवयवांमध्ये पसरला नव्हता,” असंही सेरसेक म्हणाल्या. या रुग्णांच्या शरीरात कॅन्सर इतर अवयवांमध्ये न पसरल्याने त्यावर मात करणं शक्य झालं.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

चाचण्या, संशोधन आवश्यक
अनेक कर्करोग संशोधकांनी या औषधासंदर्भात माहिती जाणून घेतली आणि या उपचारांबद्दलचा तपशील घेतलाय. या संशोधकांनी मीडिया आउटलेटला सांगितले की, हे उपचार आशादायक दिसत आहे. मात्र अधिक रुग्णांसाठी ते कार्य करेल की नाही आणि कर्करोगावर खरोखर मात करता येईल की नाही हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक आहेत.