‘कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता

ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत.

युरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे.

हे वाचले का?  इस्रायलचा पश्चिम किनारपट्टीवर हल्ला; नऊ ठार

करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, राष्ट्रीय पातळीवर प्राधिकृत करण्यात आलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लशींना स्वीकृती देण्याची मुभा सदस्य देशांना वैयक्तिकरीत्या असणार आहे. ज्या लोकांना कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लस घेतली आहे, त्यांना ‘ग्रीन पास’ योजनेंतर्गत युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पात्र ठरवले जाण्याची शक्यता कमी आहे, अशी शंका भारतात व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

करोना प्रतिबंधक लशीसाठी ‘झायडस कॅडिला’चा अर्ज

‘झायकोव्ह-डी’ या आपल्या करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळण्यासाठी आपण भारताच्या औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) अर्ज केला असल्याचे झायडस कॅडिला कंपनीने गुरुवारी सांगितले. आपल्या कोविड-१९ लशीसाठी आपण आतापर्यंत भारतातील ५० केंद्रांवर आतापर्यंतची सर्वात मोठी नैदानिक चाचणी केली असल्याचीही माहिती कंपनीने दिली. ‘आपल्या झायकोव्ह-डी या करोना प्रतिबंधक प्लाझ्मिड डीएनए लशीच्या आपत्कालीन वापरासाठी कंपनीने डीसीजीआय कार्यालयात अर्ज केला आहे,’ असे झायडस कॅडिलाने एका निवेदनात सांगितले. या लशीला मान्यता मिळाल्यानंतर ती केवळ प्रौढांसाठीच नव्हे, तर १२ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरांसाठीही फायदेशीर ठरेल, असे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले