कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा डेल्टा, ओमायक्रॉनवर प्रभावी

कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा करोनाच्या डेल्टा उत्प्रेरित रूपावर प्रभावी ठरत असून ओमायक्रॉनच्या बीए १.१ आणि बीए २ या उपप्रकारांपासून संरक्षण देते.

पीटीआय, नवी दिल्ली : कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा करोनाच्या डेल्टा उत्प्रेरित रूपावर प्रभावी ठरत असून ओमायक्रॉनच्या बीए १.१ आणि बीए २ या उपप्रकारांपासून संरक्षण देते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेकच्या आभ्यासात हे स्पष्ट झाले.

सीरियन हॅमस्टर मॉडेलनुसार (मानवाशी संबंधित आजारांचा आभ्यास करणारे पशू मॉडेल) डेल्टाविरोधात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दोन किंवा तीन मात्राच्या क्षमतेचा आणि ओमिक्रॉनच्या उपप्रकारांविरोधातील प्रभावाचा अभ्यास करण्यात आला. त्याची माहिती मंगळवारी ‘बायोआरक्सिव’मध्ये प्रकाशित करण्यात आली.

हे वाचले का?  रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन

डेल्टा संसर्गाच्या आभ्यासात लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मात्रेदरम्यानचा अभ्यास केला. त्यावेळी वर्धक मात्रेची उपयुक्तता लक्षात आली, असे आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले. लशीच्या तिसऱ्या मात्रेनंतर फुप्फुसाच्या आजाराची तीव्रता कमी होती, असेही सांगितले.

दुसऱ्या आभ्यासानुसार ओमायक्रॉनच्या बीए १ आणि बीए २ या उपप्रकाराच्या विरोधात सुरक्षेबाबत अभ्यास करण्यात आला. ‘प्लेसीबो’ गटापेक्षा लस घेणाऱ्या गटात संसर्गाची तीव्रता कमी होती. फुप्फुस संसर्गही कमी प्रमाणात होता. त्यामुळे आताच्या अभ्यासानुसार कोव्हॅक्सिनची वर्धक मात्रा डेल्टा आणि ओमायक्रॉन उपप्रकारांसंबंधी आजाराची तीव्रता कमी करते, असेही आयसीएमआर आणि भारत बायोटेकने स्पष्ट केले.