कौशल्य विकास अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवा, राज्यपाल रमेश बैस यांची मुक्त विद्यापीठाला सूचना

स्थापनेपासून आजपर्यंत ७५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या वाटचालीबाबत बैस यांनी समाधान व्यक्त केले.

नाशिक: पारंपरिक विद्यापीठापेक्षा वेगळी वाट निवडणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठापुढे आगामी काळात आधुनिक शिक्षण प्रणालीचे मोठे आव्हान आहे. कौशल्य विकासावर भर देणाऱ्या अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवत नेऊन तळागाळापर्यंत पोहोचतानाच आपला विद्यार्थी वैश्विक पातळीवरील आव्हानांना सामोरा जाऊ शकेल, यापद्धतीने ध्येय धोरणांची आखणी व अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी राजभवनात राज्यपाल बैस यांची भेट घेतली. विद्यापीठाची आजवरची वाटचाल आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. विद्यापीठाच्यावतीने राज्यपाल बैस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपाल बैस यांनी काही सूचना केल्या. विद्यार्थ्याला अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण बनविण्याची क्षमता नवीन शैक्षणिक धोरणात आहे. या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतून मुक्त विद्यापीठ ज्ञानगंगा घरोघरी हे आपले ब्रीद अधिक प्रभावीपणाने राबवू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुक्त विद्यापीठाची कार्यप्रणाली, हेतू, उद्दिष्ट्ये तसेच आजवरची वाटचाल याबाबत प्रा. सोनवणे यांनी संवाद साधला.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

स्थापनेपासून आजपर्यंत ७५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या वाटचालीबाबत बैस यांनी समाधान व्यक्त केले. नवी शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला अधिकाधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करण्याची क्षमता बाळगून आहे आणि आजचा विद्यार्थी नव्या जगातील आव्हानांना सामोरा जाऊ शकेल, या दृष्टीने विद्यापीठ नक्कीच प्रभावी काम करू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशभरातील तज्ज्ञांचे विद्यापीठ कामकाजात मार्गदर्शन घेण्याची सूचनाही त्यांनी केली. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी त पांडुरंगाची मूर्ती भेट देवून त्यांचा सत्कार केला आणि विद्यापीठ येत्या पाच वर्षात शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच भरीव कामगिरी करेल, अशी ग्वाहीही दिली.

हे वाचले का?  Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी