– खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आली घोषणा
राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी दुर्गप्रेमी संस्थांचा राज्यव्यापी दुर्ग महासंघ स्थापन करण्यात येत आहे, अशी घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी येथे केली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या ५० व्या जन्मदिवसानिमित्त दुसऱ्या दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, दुर्ग महासंघाचे काम हे राजकारण विरहीत असेल. या कामात मी राजकारण करतोय असे वाटले तर मलाही बाजूला करा. आपल्याला सरकारला धारेवर धरायचे नाही पण आम्हाला विश्वासात घेऊन गड किल्ल्यांचे जतन केले पाहिजे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. राज्यात अनेक वर्षे शासनाने किल्ल्यांचे जतनाकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते सांस्कृतिक व पर्यटन खाते हे बोगस आहे. त्यांच्याकडे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी नसतो. निधी कुठून उपलब्ध होणार हा प्रश्न आहे. दुर्ग महासंघाच्यावतीने केंद्रीय पुरातत्व विभागाची सामंजस्य करार करावा लागेल. त्यातून १० किल्ल्यांच्या जतन- संवर्धनाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करतात येईल, असे म्हणत त्यांनी कामाची रूपरेखा स्पष्ट केली.
परिषदेतील ठराव –
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना व्हावी. विद्यापीठ, शालेयस्तरावर गड किल्ल्यांचे जतन व संवर्धनाचा अभ्यास सुरू करावा. अनोंदीत गड-किल्ल्यांची नोंद राज्य पुरातत्त्व विभागाकडे करण्यात यावी. वासोट्याच्या धरतीवर सर्व किल्ल्यांवर प्लास्टिक बंदी करण्यात यावी. आदी ठराव परिषदेत घेण्यात आले.
हेमंत साळुंखे यांनी स्वागत व संयोजक सुखदेव गिरी यांनी प्रास्ताविक केले. चर्चासत्रात राम यादव, वरुण भामरे यांनी गड किल्ल्यांविषयी माहिती दिली. धनंजय जाधव यांनी आभार मानले. संयोगिता युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय जाधव यांनी आभार मानले.