गणेशोत्सवातील ‘शिधा’ नवरात्रीत; दिवाळीत ‘आनंदा’ला तोटा!

शिधा वितरणातील दिरंगाई आणि अचडणी लक्षात घेता दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ पाठवूच नका, अशी विनंती रायगडच्या पुरवठा विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.
अलिबाग : गोरगरिबांचा गणेशोत्सव ‘आनंदा’त जावा यासाठी महायुती सरकारने ‘शिधा’ देण्याची घोषणा केली. मात्र ‘सरकारी काम अन् महिनाभर थांब’ असेच घडले आणि त्या शिध्याचे वितरण नवरात्रीत सुरू झाले. शिधा वितरणातील दिरंगाई आणि अचडणी लक्षात घेता दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’ पाठवूच नका, अशी विनंती रायगडच्या पुरवठा विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.

सणासुदीत १०० रुपयांत विविध जिन्नस उपलब्ध करून देणारी ‘आनंदाचा शिधा’ योजना गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. सर्वसामान्यांना सणवार उत्साहात साजरे करता यावेत, हा या योजनेमागचा उद्देश आहे. मात्र शिधा कधीही वेळेत उपलब्ध होत नसल्याने सण उलटून गेल्यानंतर शिधावितरणाची वेळ रेशन दुकानदारांवर येते. गणेशोत्सवानिमित्त जाहीर झालेल्या शिध्याचे वाटप अद्यापही पूर्ण झालेले नाही. लाभार्थ्यांकडूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने हा शिधा संपवयाचा कसा, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. साखर, रवा, गोडेतेल खराब होत असल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

नियमित धान्य वितरण, साडी वाटप, आधारकार्ड रेशनकार्डशी जोडणे या कामांमध्ये आनंदाचा शिधा वाटपाची भर पडली आहे. याचा परिणाम अन्य कामांवर होत असल्याची दुकानदारांची तक्रार आहे. त्यामुळे आता दिवाळीत आनंदाचा शिधा पाठवू नये, असा तगादा दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे लावला आहे. गेल्यावेळी जिन्नस विकले न गेल्याने यंदा गणेशोत्सवात १५ टक्के कमी मागणी नोंदविण्यात आली होती.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

गणेशोत्सवासाठी पाठविलेल्या शिध्याचे वाटप सुरू असून त्यास वेळ लागत आहे. त्यामुळे दिवाळीसाठी आनंदाचा शिधा पाठवू नये, असा अहवाल पाठवल्याची माहिती रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी दिली.

गणेशोत्सवात जाहीर झालेल्या ‘आनंदाचा शिधा’चे वितरण सरकारी दिरंगाईमुळे नवरात्रीत सुरू आहे. त्यामुळे आता दिवाळीचा शिधा पाठवूच नका, अशी भूमिका पुरवठा विभागाने घेतली आहे.

१०० रुपये खर्चून आनंदाचा शिधा विकत घेण्याकडे लाभार्थ्यांचा कल नाही. दुकानांमध्ये मोफत धान्य वितरित केले जात असताना पैसे देऊन रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ विकत घेण्याकडे अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी दुर्लक्ष करीत आहेत. याचा विक्रीवर परिणाम होत आहे. – प्रमोद घोसाळकर, जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा रेशन दुकानदार संघटना

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा