गरोदरपणात आरोग्याची नियमित तपासणी आवश्यक; जिल्ह्यातील तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भारती पवार यांची सूचना

सशक्त पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरुवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.

नाशिक : सशक्त पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरुवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच अतिजोखमीच्या मातांचा शोध घेऊन त्यांना गरोदरपणात लागणाऱ्या आरोग्याच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

जिल्ह्यातील ७५ आरोग्य केंद्रांवर गरोदर मातांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा आरंभ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात  डॉ. भारती पवार यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने मातांना सुरक्षा तसेच सुरक्षित मातृत्व देण्यासाठी अनेकविध योजना राबविण्यात येत असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. गरोदर मातांची नोंदणी, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, नियमित लसीकरण अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मातांना आरोग्यविषयक आवश्यक सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असल्याने माता आणि बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्य सेवा जोडली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मातेचे आरोग्य निरोगी असणे महत्त्वाचे आहे. निरोगी मातृत्वातून सशक्त भारताचे भविष्य घडणार आहे, सर्व आरोग्य यंत्रणांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर मानवतेचा संदेश देणारे आहे. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत सहजतेने पोहचून त्यांना रुग्णसेवा, औषधोपचार पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी सूचना डॉ. पवार यांनी केली. भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोच्च स्थान असल्याने गर्भवती तसेच मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वानी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले.