ग्रामपंचायतींवरील वर्चस्वासाठी आमदारांकडून विकास निधीचे आश्वासन

शक्तिशाली गटातील वर्णीसाठी कार्यकर्ते प्रयत्नशील

शक्तिशाली गटातील वर्णीसाठी कार्यकर्ते प्रयत्नशील

नाशिक : महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर जिल्ह्य़ात प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना राजकीयदृष्टय़ा चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आपल्या पक्षाचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले असून राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी अधिक विकासनिधी देण्याचे आश्वासन दिले आहे.

थंडीचा जोर वाढू लागला तसतसे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते शक्तिशाली गटात वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका होत नसल्या तरी आपल्या पक्षाच्या समर्थकांची सत्ता अधिकाधिक ग्रामपंचायतींवर यावी, यासाठी प्रस्थापित लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्य़ात ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच विविध पक्षांच्या नेत्यांचा ताप वाढला आहे. सर्वच कार्यकर्त्यांना खूश ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गटा-तटाच्या राजकारणाचा जोर वाढू लागल्याने पाच वर्षे सुखाने नांदणाऱ्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

हे वाचले का?  पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नवीन क्लृप्ती शोधली आहे.

गावात एकोपा राहण्यासाठी निवडणुका अविरोध करण्याकरिता समाजमाध्यमातून आवाहन केले जात आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी ज्या गावात निवडणुका बिनविरोध होतील किंवा जे गाव निवडणुकीनंतर गावात हरित तसेच स्वच्छतेसाठी उपक्रम राबवतील अशा  गावाला ५० लाख रुपये विकासनिधी देण्याचे जाहीर के ले आहे. शिवाय शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा संकलनासाठी घंटागाडी देण्याचे आश्वासन दिले आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी मतदारसंघात ज्या गावात निवडणुका बिनविरोध होतील त्या गावासाठी २५ लाख रुपये विकासनिधी देण्याचे आश्वासन दिले आहे. इतर राजकीय पक्षांकडूनही आता कोणकोणती आश्वासने दिली जातात, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघ आदर्श करण्याचे स्वप्न असून गावे तंटामुक्त करून सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज करण्याचा मानस आहे. करोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ढासळली असून बिनविरोध निवडणुकीमुळे आर्थिक बचत होण्यास मदत होईल.

हे वाचले का?  इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

– माणिकराव कोकाटे (आमदार, सिन्नर)

माझ्या देवळाली मतदारसंघातील ज्या गावात बिनविरोध निवडणुका होतील त्या गावातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल.

– सरोज अहिरे (आमदार, देवळाली-नाशिकरोड)